घाऊक महागाई दरात वाढ; जानेवारीत ३.१ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 05:18 AM2020-02-15T05:18:18+5:302020-02-15T05:18:38+5:30
कांदे-बटाटे आदींच्या किमती वाढल्याचा परिणाम; उद्दिष्टांची मर्यादा ओलांडली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर जानेवारीमध्ये वाढून ३.१ टक्के झाला. आदल्या महिन्यात तो २.५९ टक्के होता. कांदा आणि बटाटे यासारख्या खाद्यवस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईच्या दरात वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी या अवधीत मासिक घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित वार्षिक महागाईचा दर २.७६ टक्के होता. खाद्यवस्तूंपैकी भाजीपाल्याचे दर सर्वाधिक ५२.७२ टक्क्यांनी वाढले. कांद्यातील अतितीव्र दरवाढ याला कारणीभूत ठरली. कांद्याचे दर तब्बल २९३ टक्क्यांनी वाढले. तर बटाट्याचे दर ३७.३४ टक्क्यांनी वाढले. या आठवड्याच्या सुरुवातीला ग्राहक वस्तू निर्देशांकावर (सीपीआय) आधारित महागाईची आकडेवारी सरकारने जाहीर केली. जानेवारीत सीपीआय वाढून ७.५९ टक्के झाला. हा सहा वर्षांचा उच्चांक असून, रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेल्या महागाई उद्दिष्टाची मर्यादा ओलांडली गेली आहे. भाजीपाला आणि खाद्यवस्तूंच्या दरवाढीमुळे सीपीआय निर्देशांक वाढला आहे. महागाईचा हा मे २0१४ नंतरचा उच्चांक ठरला आहे. मे २0१४ मध्ये हा दर ८.३३ टक्क्यांवर होता.
गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने दुमाही पतधोरण आढावा जाहीर केला. यात धोरणात्मक व्याजदर ५.१५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेबाबतचा दृष्टिकोनही रिझर्व्ह बँकेने समावेशी (अॅकॉमॉडेटिव्ह) असा कायम ठेवला आहे.
सर्वच वस्तू महाग
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या जानेवारीत खाद्यवस्तूंच्या महागाईचा दर ११.५१ टक्के राहिला. आदल्या महिन्यात तो २.४१ टक्के होता. खाद्य वस्तू वगळता अन्य पदार्थ व उत्पादने यांचा महागाईचा दर जवळपास तिपटीने वाढून ७.८ टक्के झाला. डिसेंबरमध्ये तो २.३२ टक्के होता.