Rishabh Pant Health Update: कृपा करा, रिषभला बरे होऊ द्या! मंत्री, अधिकारी, चाहत्यांना कुटुंबीयांची कळकळीची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 01:34 PM2023-01-02T13:34:16+5:302023-01-02T13:35:29+5:30
Rishabh Pant Health Update: रिषभला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे, असे सांगण्यात येत आहे.
Rishabh Pant Health Update: भारतीय संघाचा यष्टिरक्षक आणि फलंदाज रिषभ पंत याचा रुरकी येथे भीषण अपघात झाला. या अपघातातूनरिषभ पंत थोडक्यात बचावला. हा अपघात एवढा भीषण होता की, लक्झरी कार जळून खाक झाली. रिषभ पंतवर उपचार सुरू आहेत. रिषभ लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी सोशल मीडियावरून प्रार्थना केल्या जात आहेत. रिषभला रिकव्हर व्हायला काही महिने लागू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अपघात झाल्याची माहिती मिळताच मंत्री, अधिकारी, चाहत्यांची रिषभ पंतला भेटण्यासाठी रांग लागल्याचे सांगितले जात आहे. यातच आता कुटुंबीयांनी कळकळीची विनंती केली आहे. कृपा करून रिषभला आधी बरे होऊ द्या, असे आवाहन कुटुंबाकडून करण्यात आले आहे. रिषभ पंतला भेटण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रुग्णालयात पोहोचत आहेत. यामध्ये आमदार, मंत्री, अधिकारी तसेच चित्रपट कलाकार, पंतचे चाहते यांचा समावेश आहे. मॅक्स हॉस्पिटलमध्ये पोहोचून रिषभ पंतच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. पाहुण्यांच्या या गर्दीमुळे जखमी रिषभला विश्रांती मिळत नाही. रुग्णालयाच्या निर्धारित वेळेनंतरही रिषभला भेटणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे आता ऋषभला विश्रांतीची संधी द्यावी, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
रिषभ पंतला अजूनही वेदना होत आहेत
रिषभला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया रिषभ पंतची देखभाल करणाऱ्या वैद्यकीय चमूतील डॉक्टरांनी दिली. तसेच अपघातात झालेल्या दुखापतींमुळे त्याला अजूनही वेदना होत असून त्याच्या भेटीसाठी गर्दी न करता त्याला विश्रांतीसाठी वेळ द्यावा, असे आवाहनही केले आहे.
दरम्यान, पंतला रुग्णालयाच्या खासगी वॉर्डात हलवण्यात आले आहे. संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक श्याम शर्मा यांनी सांगितले की, पंत सध्या बरा आहे. संसर्गाचा धोका पाहून त्यांना खासगी वॉर्डात हलवण्यात आले आहे. पंतच्या लिगामेंटच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल. बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतच्या कपाळावर दोन कट, गुडघा, मनगट, घोटा आणि पायाचे लिगामेंट फाटले. याशिवाय पंतच्या पाठीला दुखापत झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. पूर्ण बरी होईपर्यंत ते डेहराडून येथील रुग्णालयातच राहील, असेही शर्मा यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"