‘लोकमत’चे ऋषी दर्डा यांच्यासह २५ मान्यवर अबुधाबीच्या युवराजांच्या मेजवानीत सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 09:10 AM2024-09-12T09:10:32+5:302024-09-12T09:11:17+5:30
भारत व संयुक्त अरब अमिराती (यूएई)यांच्यात गेल्या काही वर्षांत जे उत्तम राजनैतिक संबंध निर्माण झाले आहेत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराज अल् नाहयान यांनी समाधान व्यक्त केले.
नवी दिल्ली - अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद नाहयान यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत आयोजिलेल्या मेजवानीप्रसंगी लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांच्यासह २५ निवडक मान्यवर सहभागी झाले होते. या दौऱ्यात अबुधाबीच्या युवराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा केली.
युवराज या नात्याने पहिल्या अधिकृत विदेश दौऱ्यावर आलेले अल् नाहयान यांच्या सन्मानार्थ दिल्लीतील हैदराबाद हाउस येथे मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पंतप्रधान कार्यालय व परराष्ट्र खात्याकडून भारतातील उद्योग, माध्यम, शिक्षण, वैद्यकीय आदी क्षेत्रातील निवडक २५ जणांना आमंत्रण देण्यात आले होते. भारत व संयुक्त अरब अमिराती (यूएई)यांच्यात गेल्या काही वर्षांत जे उत्तम राजनैतिक संबंध निर्माण झाले आहेत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराज अल् नाहयान यांनी समाधान व्यक्त केले.
मेजवानीप्रसंगी कोण कोण होते उपस्थित?
nपंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद नाहयान यांच्यातील चर्चेनंतर सोमवारी आयोजिलेल्या मेजवानीप्रसंगी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डाॅ. पी. के. मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी, आयटीसी लिमिटेडचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक संजीव पुरी, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सचिव अनिता प्रवीण, परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, यूएईतील भारतीय राजदूत संजय सुधीर, महिंद्रा समूहाचे सीईओ तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे प्रबंध संचालक डॉ. अनीश शाह, पंतप्रधानांचे संयुक्त सचिव दीपक मित्तल, लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांचा समावेश होता.
तसेच या मेजवानीप्रसंगी ओएनजीसीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार सिंह, ऑइल इंडिया लिमिटेडचे (ओआयएल) अध्यक्ष व प्रबंध संचालक रंजीत रथ, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या विपणन विभागाचे संचालक व्ही. सतीश कुमार, पंतप्रधान कार्यालयाचे ओएसडी हिरेन जोशी, वरिष्ठ पत्रकार संजय पुगलिया, इंडिया इंक ग्रुपचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज लाडवा आदी मान्यवरही होते.
शुद्ध शाकाहारी भोजन
भारत दौऱ्यावर आलेल्या यूएईच्या शिष्टमंडळाला शुद्ध शाकाहारी ‘सेवहन कोर्स मील’ देण्यात आले. या जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे कोफ्ता, गुलाबजाम, मटारपासून बनविलेले पदार्थ, कुल्फी आदी खाद्यपदार्थांचा समावेश होता. सर्व पाहुण्यांनी या जेवणाचा आस्वाद घेतला.