ऋषी सुनक अन् नरेंद्र मोदींची लवकरच भेट होणार; भारतासह जगाचं लागलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 01:11 PM2022-10-26T13:11:40+5:302022-10-26T13:16:32+5:30

ऋषी सुनक यांचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अभिनंदन केलं आहे.

Rishi Sunak and PM Narendra Modi will meet soon; The attention of the world, including India | ऋषी सुनक अन् नरेंद्र मोदींची लवकरच भेट होणार; भारतासह जगाचं लागलं लक्ष

ऋषी सुनक अन् नरेंद्र मोदींची लवकरच भेट होणार; भारतासह जगाचं लागलं लक्ष

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी मंगळवारी किंग चार्ल्स तिसरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर औपचारिकपणे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला आणि नवा इतिहास रचला. तत्पूर्वी, मावळत्या पंतप्रधान लिज ट्रस यांनी सकाळी १०, डाउनिंग स्ट्रीट येथे आपल्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीनंतर राजीनामा दिला. 

बँकर ते राजकारणी असा प्रवास करणारे ४२ वर्षीय सुनक हे २१० वर्षांतील ब्रिटनचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. ते ब्रिटनचे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. लंडनमध्ये १०, डाउनिंग स्ट्रीट येथे आपल्या पहिल्या संबोधनात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ब्रिटनवासीयांना सुनक यांनी यातून बाहेर पडण्याचा विश्वास दिला. सुनक हे या वर्षातील तिसरे पंतप्रधान आहेत.

ऋषी सुनक यांचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अभिनंदन केलं आहे. तसेच ऋषी सुनक आणि नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेते इंडोनेशियामध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी १५-१६ नोव्हेंबर रोजी बाली येथे असतील, जिथे त्यांची भेट होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सदर द्विपक्षीय बैठकीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी जगातील २० मोठ्या अर्थव्यवस्थांच्या परिषदेदरम्यान दोन्ही नेते एकत्र असतील आणि अनेक कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहेत.

दरम्यान, मी अशा काळात पदभार स्वीकारला आहे जेव्हा देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. त्याला कोरोना आणि रशिया - युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी आहे. काही चुका झाल्या आहेत. पण, त्यामागचा हेतू चुकीचा नव्हता. या चुका दुरुस्त करण्यासाठी मला पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहे. केवळ बोलून नव्हे, तर कृतीतून मी देशातील लोकांना एकजूट करेन. मी आपल्यासाठी दिवसरात्र काम करेन, असं ऋषी सुनक यांनी म्हटलं आहे.

कठोर निर्णयांचे  दिले संकेत-

सुनक यांनी कठोर निर्णय घेण्याचे संकेत देत कोरोना काळात केलेल्या विशेष कामगिरीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, देशाचे नेतृत्व करण्यासाठी मी तयार आहे. राजकारणापेक्षा तुमच्या गरजांना प्राधान्य दिले जाईल. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो. बोरिस जॉन्सन यांच्या संदर्भात ते म्हणाले, पक्षाने जिंकलेला जनादेश ही व्यक्तीची मालमत्ता नाही. आपल्या सर्वांना एकत्र आणणारा आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Rishi Sunak and PM Narendra Modi will meet soon; The attention of the world, including India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.