...तर पुन्हा कोरोनाच्या संसर्गाचा धोका; वैद्यकीय तज्ज्ञांकडून महत्त्वाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 08:00 AM2021-08-13T08:00:35+5:302021-08-13T08:00:59+5:30
पुरवठ्याअभावी लसीकरणातील खंड धोकादायक
मुंबई : एकीकडे लसीकरणात सातत्याने पडणारा खंड आणि दुसरीकडे निर्बंधामध्ये येणारी शिथिलता यामुळे संसर्गाचा धोका कायम असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. केवळ लसींच्या पुरेशा साठ्याअभावी लसीकरण मोहीम बंद होणे हे कोरोनाविरोधातील एकमेव शस्त्र बोथट करण्यासारखे आहे. त्यामुळे केंद्र शासनानेही लसींच्या साठ्याची बाब गांभीर्याने घ्यावी आणि लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यासाठी सहकार्य करावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
केईएम रुग्णालयाचे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, निर्बंध शिथिलतेमुळे रस्त्यांवर पर्यटनाकरिता लोकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे लसींच्या डोसअभावी लसीकरण थांबणे चुकीचे आहे. पालिका प्रशासन वा राज्य शासन केंद्राकडे लसींच्या साठ्याकरिता वारंवार विनवण्या करीत आहे, त्यामुळे लसीकरण पूर्ण होणे वा गतीने होणे गरजेचे आहे. नाही तर, पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेच्या माध्यमातून कोरोना डोके वर काढेल आणि त्याची तीव्रता किती असेल याविषयी अजूनही संशोधन सुरू आहे.
राज्य कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) या संस्थेचा अभ्यास अहवाल जाहीर झाला आहे. कोरोनाचा नवा व अधिक संसर्गक्षम डेल्टा प्रकारामुळे लसीकरण करण्याचे आवाहन यात शास्त्रज्ञांनी केले आहे. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशांनाही लस घ्यावी, असा सल्लाही अहवालातून दिला आहे.
केंद्र सरकारने आताच पावले उचलावीत!
लसीकरणामुळे शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होत असल्याचे पुरावे प्रयोगशाळेत मिळाले आहेत. विषाणूच्या नव्या प्रकारापासून लसीमुळे संरक्षण मिळत आहे, असेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे भविष्यातील संसर्गाचा धोका टाळण्यासाठी केंद्राने आताच पावले उचलावीत.
आधी कोरोना झाला असला तरी लस घ्या. विषाणूचे म्युटेशन अधिक धोकादायक असल्याने स्वतः व संपर्कातील लोक सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण हा उत्तम उपाय आहे, असे आवाहन डॉ. रोशन शहा यांनी केले.