Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृतदेहापासून संक्रमणाचा धोका किती वेळ राहतो? AIIMS च्या रिपोर्टमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 07:27 AM2021-05-26T07:27:41+5:302021-05-26T07:29:43+5:30
मृतदेह हाताळणार्या लोकांनी खबरदारी म्हणून मास्क, ग्लोव्हज आणि पीपीई किट घालावे असंही डॉक्टरांनी सांगितले आहे.
नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे बळी घेतले आहेत. अलीकडे कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी मृतांची वाढलेली आकडेवारी चिंतेचे कारण आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेहही कुटुंबातील सदस्य घ्यायला तयार नाहीत अशा अनेक बातम्या समोर येतात. यात आता दिल्लीतील प्रसिद्ध एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर किती काळ कोरोनाचे विषाणू सक्रीय असतात त्यावर रिसर्च केला आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) चे फॉरेन्सिक हेड डॉ. सुधीर गुप्ता यांनी म्हटलं आहे की, एका संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर १२ ते २४ तासानंतर कोरोना विषाणू नाक आणि घशात सक्रीय राहत नाही. त्यामुळे मृतापासून कोरोना संसर्गाचा धोका जास्त नाही, मृत्यूनंतर १२ ते २४ तासांच्या काळात जवळपास १०० मृतदेहांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं त्यांनी सांगितले.
मृत्यूच्या २४ तासानंतर, विषाणू नाक आणि घशात सक्रीय राहत नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त नाही. गेल्या एक वर्षात एम्समधील फॉरेन्सिक मेडिसिन विभागात 'कोविड -१९ पॉझिटिव्ह मेडिको-लीगल' मृतदेहांवर अभ्यास करण्यात आला. या मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पार्थिवाच्या शरीरातून बाहेर येणारे द्रवपदार्थ टाळण्यासाठी नाक आणि घशाचा भाग बंद केला पाहिजे. असे मृतदेह हाताळणार्या लोकांनी खबरदारी म्हणून मास्क, ग्लोव्हज आणि पीपीई किट घालावे असंही डॉक्टरांनी सांगितले आहे.
मृतदेहाच्या अस्थी सुरक्षित
मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या अस्थी आणि राख ही पूर्णपणे सुरक्षित आहे. अस्थींतून संक्रमण पसरण्याचा कोणाताही धोका नाही. एम्सने मे २०२० मध्ये जारी केलेल्या कोविड १९ रुग्णांच्या मृत्यूनंतर एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. त्यात फॉरेन्सिक पोस्टमोर्टम करणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी. कारण मृतकाच्या शरीरात असणारे द्रव पदार्थाच्या संपर्कात येणंही जीवघेण्या रोगाच्या संपर्कात येण्याचा धोका होऊ शकतो.