कोरोनाच्या साथीमुळे वैद्यकीय उपकरणांच्या टंचाईचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 01:49 AM2020-02-27T01:49:25+5:302020-02-27T01:50:03+5:30
वस्तूंचा पुरवठा पूर्णत: ठप्प; सर्जिकल मास्कलाही मोठी मागणी
मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीमुळे औषधांचीच नव्हेतर, नियमित वापरातील बहुतांश वैद्यकीय उपकरणांचीही तीव्र टंचाई निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या उपकरणांत डिजिटल थर्मामीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, नेब्युलायझर, रक्तदाब मापक, ग्लुकोमीटर, प्रेग्नन्सी कीट, सर्जिकल मास्क आणि सीटीस्कॅन व एमआरआय यात वापरल्या जाणाऱ्या प्रतिमा साधनांचा समावेश आहे.
सूत्रांनी सांगितले की, नियमित वापरातील बहुतांश वैद्यकीय उपकरणे इलेक्ट्रॉनिक्सची आहेत. यातील काही उपकरणे तयार स्वरूपात चीनमधून आयात होतात. काही उपकरणांचे सुटे भाग चीनमधून आणून भारतात जुळणी केली जाते. चीनच्या हँगझॉऊ आणि डाँगगुआन प्रांतातून ही आयात प्रामुख्याने होते. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनमधून होणारा या वस्तूंचा पुरवठा पूर्णत: ठप्प झाला आहे. इतक्यात तो सुरू होण्याची शक्यताही नाही. त्यामुळे या उपकरणांची मोठी टंचाई निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मार्चअखेर अथवा एप्रिलपासून पुढे या उपकरणांची निर्मिती सुट्या भागांअभावी बंद होईल, असे या क्षेत्रातील उद्योजकांनी म्हटले आहे.
रुग्णाच्या शरीराला स्पर्श न करता ताप मोजण्यासाठी वापरले जाणारे इन्फ्रारेड थर्मामीटर (टेम्परेचर गन) केवळ चीनमधूनच येते. कोरोना साथ सुरू झाल्यापासून टेम्परेचर गनची तीव्र टंचाई आहे.
डिजिटल थर्मामीटरचीही हीच स्थिती आहे. दक्षिण कोरिया, सिंगापूर, हाँगकाँग यासह अनेक आफ्रिकी देशांतून या तापमापींची चौकशी भारतीय उत्पादकांकडे केली जात आहे. तीन स्तरांच्या सर्जिकल मास्कलाही मोठी मागणी आहे. आणीबाणीच्या काळात भारतात टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी या वस्तूंची निर्यात रोखण्याची मागणी उद्योजकांनी सरकारकडे केली आहे.
चीनमधून होते आयात
सूत्रांनी सांगितले की, वैद्यकीय उपकरणांची भारतीय बाजारपेठ १५ अब्ज डॉलरची आहे. यातील ८० टक्के उपकरणे आयातीवर अवलंबून आहेत. हृदयाचे स्टेंट, हाडांचे इम्प्लान्ट, सुया, ग्लुकोमीटर, अतीव दक्षता उपकरणे, ग्लोव्हज, क्रेपी बॅण्डेज, आयव्ही सेट, ब्लड ट्रान्सफ्युजन सेट इत्यादी असंख्य उपकरणांचाही त्यात समावेश आहे. यातील केवळ १० ते २० टक्के उपकरणे भारतात बनवली जातात. त्यासाठी लागणारा कच्चा मालही चीनमधूनच येतो.