Uttar Pradesh Assembly Election: भाजपला धक्का; मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजप खासदारपुत्र पोहोचले अखिलेश यादवांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 10:53 PM2022-02-22T22:53:21+5:302022-02-22T22:58:26+5:30
Uttar Pradesh Assembly Election: लखनऊमध्ये उद्या होणार मतदान; भाजप खासदारपुत्र अखिलेश यादवांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ
लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक प्रचाराला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी भाजपचे मंत्री आणि आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता तीन टप्प्यातलं मतदान पार पडल्यानंतर अखिलेश यादव यांनी भाजपला जोरदार झटका दिला आहे. भाजपच्या खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचे पुत्र मयंक जोशी यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मयंक जोशी यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. मयंक जोशी यांना लखनऊ केंटमधून उमेदवारी हवी होती. त्यांना तिकीट मिळावं यासाठी रिटा बहुगुणा जोशी प्रयत्नशील होत्या. पुढील लोकसभा निवडणुकीत मला तिकीट नको. पण विधानसभा निवडणुकीत मयंकला उमेदवारी द्या, अशी मागणी त्यांनी नेतृत्त्वाकडे केली होती. मात्र मयंक यांना तिकीट दिलं गेलं नाही.
उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री स्वर्गीय हेमवती नंदन बहुगुणा जी के नाती श्री मयंक जोशी जी ने माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश यादव जी से की शिष्टाचार भेंट। pic.twitter.com/yBB9CaAWVv
— Samajwadi Party (@samajwadiparty) February 22, 2022
लखनऊमध्ये उद्या मतदान होणार आहे. मात्र त्याआधीच मयंक अखिलेश यांच्या भेटीला पोहोचले. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मयंक समाजवादी पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. पण त्यांनी मतदानाच्या एक दिवस आधी अखिलेश यादव यांचीभेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीचा थेट परिणाम उद्या होणाऱ्या मतदानावर होऊ शकतो.
उत्तर प्रदेशातल्या हाय प्रोफाईल मतदारसंघांमध्ये लखनऊ केंटचा समावेश होतो. इथून भाजपनं राज्य मंत्री बृजेश पाठक यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं आहे. याच मतदारसंघातून अपर्णा यादव यांनाही उमेदवारी हवी होती. अखिलेश यादव यांच्याकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्यानं अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारली. अपर्णा यादव या मुलायम सिंग यादव यांच्या सूनबाई आहेत.