शाब्बास पोरी! आई करते घरकाम, वडील शिपाई; लेकीला पहिल्याच प्रयत्नात मिळालं 20 लाखांचं पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 10:27 AM2023-01-24T10:27:50+5:302023-01-24T10:29:11+5:30
Ritika Surin : घरची परिस्थिती बेताची, आई-वडिलांनी मुलीला शिकवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली अन् लेकीने आई-वडिलांच्या कष्टाचं सोनं केलं.
मनात प्रचंड इच्छाशक्ती आणि ध्येय निश्चित असेल तर माणूस कोणत्याही अडचणीतून बाहेर पडतो. असं म्हणतात की जगातील सर्व समस्या एका बाजूला आहेत आणि गरिबी दुसऱ्या बाजूला आहे. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. घरची परिस्थिती बेताची, आई-वडील आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते. पण मुलीला शिकवण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली अन् लेकीने आई-वडिलांच्या कष्टाचं सोनं केलं.
रितिका सुरीन असं या मुलीचं नाव असून तिने घवघवीत यश संपादन केलं आहे. तिला तब्बल 20 लाखांचं पॅकेज मिळाल्याची घटना समोर आली आहे. रितिकाची आई घरकाम, दुसऱ्यांकडे साफसफाईचं काम करते. तर वडील शिपाई आहेत. रितिकाला पहिल्याच प्रयत्नात 20 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले. रितिका मूळची झारखंडची आहे. आईचे नाव मेरी, वडिलांचे नाव नवल गलगोटिया असं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या घरात आई काम करते, त्यांनी रितिकाची अभ्यासात खूप मदत केली. पालकांनी शिक्षणात पैसा अडसर होऊ दिला नाही. मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी वडिलांनी विद्यापीठात प्रवेश घेतला. मित्र-मैत्रिणी आणि प्राध्यापकांनी मदत केली. विद्यापीठाने फीमध्ये सूट दिली.
पहिल्याच प्रयत्नात मिळाले 20 लाखांचे पॅकेज
एक नामांकित सॉफ्टवेअर कंपनी प्लेसमेंटसाठी आली होती. रितिकाला पहिल्याच प्रयत्नात वीस लाख रुपयांचे पॅकेज मिळाले. विद्यापीठाचे सीईओ ध्रुव म्हणतात की, रितिका ही इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहे. रितिकाचे चांगले मार्क्स आणि कौटुंबिक स्थिती लक्षात घेता तिला तिच्या खर्चासाठी 50 टक्के शिष्यवृत्ती मिळाली. अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"