ब्यूटी विद ब्रेन! IAS अधिकारी झाली मिसेस इंडिया; एकेकाळी वृत्तपत्र घेण्यासाठी नव्हते पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 03:55 PM2024-07-11T15:55:28+5:302024-07-11T15:57:18+5:30
नातेवाईकांनी ऋतू सुहास यांच्या निर्णयाला विरोध केला कारण महिलांनी घराबाहेर जाऊन काम करणं ही चांगली गोष्ट मानली जात नव्हती. मात्र त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि सरकारी नोकरीसाठी तयारी सुरू ठेवली.
मनात इच्छाशक्ती असेल तर अनेक गोष्टी सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. ऋतू सुहास यांनी कठोर परिश्रम घेऊन UP PCS सारखी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सौंदर्य स्पर्धा मिसेस इंडियाचा किताबही जिंकला. ऋतू सुहास या IAS अधिकारी असून त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते.
ऋतू सुहास यांचा जन्म १६ एप्रिल १९७६ रोजी लखनौमध्ये झाला. त्यांचे वडील आरपी शर्मा लखनौ उच्च न्यायालयात वकील होते. शालेय शिक्षण नवयुग गर्ल्स कॉलेजमधून झाले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. २००३ मध्ये आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी तयारी सुरू केली.
नातेवाईकांनी ऋतू सुहास यांच्या निर्णयाला विरोध केला कारण त्यावेळी महिलांनी घराबाहेर जाऊन काम करणं ही चांगली गोष्ट मानली जात नव्हती. मात्र त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि सरकारी नोकरीसाठी तयारी सुरू ठेवली. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे वर्तमानपत्र घेण्यासाठीही पैसे नव्हते.
पैसे मिळावे म्हणून त्यांनी लहान मुलांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली. अखेर त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आणि २००४ मध्ये ऋतू सुहास यांनी पीसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची पहिली पोस्टिंग मथुरा येथे एसडीएम म्हणून झाली. यानंतर आग्रा, हाथरस आणि सोनभद्र इत्यादी अनेक ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली.
ऋतू सुहास यांना चांगल्या कामासाठी सरकारने गौरविले आहे. त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना पीसीएस ते आयएएस अधिकारी म्हणून बढती मिळाली. २००८ मध्ये आयएएस अधिकारी सुहास एल वाय यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुलंही आहेत. सुहास एल वाय हे आयएएस अधिकारी आहेत आणि पॅरा-बॅडमिंटनपटू देखील आहेत.
ऋतू सुहास यांना मॉडेलिंगची खूप आवड आहे. २०१९ मध्ये झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी पटकावलं होतं. ऋतू सुहास यांचा प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे, कारण त्यांनी आपल्या जीवनात संघर्षाचा मार्ग निवडून स्वत:ची स्वप्नं साकार केली.