Riwaba Jadeja: आमदार पत्नीसोबतचा पहिला फोटो, बायकोला रविंद्र जडेजाची 'ही' विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 12:48 PM2022-12-09T12:48:13+5:302022-12-09T12:52:04+5:30
Riwaba Jadeja: आता, पती रविंद्र याने आपल्या आमदार पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
जामनगर : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा विक्रमी जागा मिळवत आपला बालेकिल्ला वाचवला. या निवडणुकीत अनेक नामांकित उमेदवार आपले नशीब आजमावत असताना सर्वांच्या नजरा जामनगर उत्तरच्या निकालाकडे लागल्या होत्या. कारण, इथे क्रिकेटर रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा या भाजपच्या उमेदवार होत्या. मात्र, रविबा यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून त्या पहिल्यांदाच आमदार बनल्या आहेत. आता, पती रविंद्र याने आपल्या आमदार पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
भाजपच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाचे (AAP) उमेदवार करशनभाई कर्मूर यांचा 50,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. या विजयानंतर रिवाबा आणि भारतीय संघाचा क्रिकेटर रवींद्र जडेजाने रोड शो देखील केला. जनतेने दिलेले प्रेम आणि आपुलकीबद्दल जामनगरवासीयांचे त्यांनी आभार मानले. माध्यमांशी संवाद साधताना रिवाबा म्हणाल्या, "गुजरातची जनता भाजपसोबत होती आणि यापुढेही राहील." त्यानंतर, आता जडेजाने पत्नीसोबतचा फोटो ट्विट केला आहे.
जडेजाने ट्विट केलेल्या फोटोत पत्नी रिवाबा यांच्या हातात MLA Gujarat असं लिहलेला टेबल स्टॉल आहे. त्यासोबत जडेजाने कॅप्शनही लिहिले असून जनतेचे आभार मानले आहेत. ''हॅलो आमदारसाहिबा तुम्ही हे पदासाठी सन्मानार्थ आहात. जामनगरच्या जनतेचा विजय झाला आहे. मी सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो. मी आशापूर्वक विनंती करतो की, जामनेरच्या जनतेची कामे खूप चांगल्या रितीने होतील. जय माताजी...'', असे गुजराती भाषेतील शब्द रविंद्र जडेजाने लिहिले आहेत. दरम्यान, या ट्विटवर चाहत्यांनी कमेंट करुन दोघांचेही अभिनंदन केले आहे.
जडेजाचेही राजकारणात येण्याचे संकेत
पत्नी रिवाबा यांचा उमेदवारी अर्ज भरताना पत्रकारांशी बोलताना खुद्द रवींद्र जडेजाने राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. मला अजून 4 ते 5 वर्षे क्रिकेट खेळायचे आहे, त्यानंतर मी राजकारणातही उतरेन, असे जडेजा म्हणाला होता. रिवाबा यांची ही निवडणूक फार चर्चेत आली होती कारण त्यांना कुटुंबातीलच विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, पती रवींद्र जडेजा त्यांच्यासोबत निश्चितच होता. अखेर रिवाबा यांनी आमदार होण्याचा मान मिळवला.