“बागेश्वर बाबांसारख्या लोकांना तुरुंगात डांबायला हवे”; बिहार दौऱ्यावरुन राजकारण तापले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 04:55 PM2023-04-30T16:55:25+5:302023-04-30T16:56:55+5:30
Bageshwar Dham Sarkar: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ५ दिवसीय अध्यात्मिक शिबिराचे पाटणा येथे आयोजन करण्यात आले आहे.
Bageshwar Dham Sarkar: गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. अलीकडेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मुंबईजवळ असलेल्या मीरारोड येथे दरबार भरवला होता. यावरून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले. यातच आता बागेश्वर धाम सरकार बिहार दौऱ्यावर जात असून, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या या दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापले असून, बागेश्वर बाबा यांच्यासारख्या लोकांना तुरुंगात डांबायला हवे, असे विधान करण्यात आले आहे.
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री बिहार दौऱ्यावर जात आहेत. पाटणा येथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ५ दिवसीय अध्यात्मिक शिबिर घेणार आहे. या अध्यात्मिक शिबिराच्या आयोजनावरून राजदने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिहारमधील राजद प्रमुख जगदानंद सिंह यांनी बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अशा लोकांना तुरुंगात डांबायला हवे, असे विधान सिंह यांनी केले आहे.
बागेश्वर बाबांसारख्या लोकांना तुरुंगात डांबायला हवे
ते (धीरेंद्र कृष्ण शास्त्री) तुरुंगात नाहीत हे दुर्दैवी आहे. बिहारमध्ये भाजप जातीयवादी गुंडांची फळी उभी करत आहे. देशातील जनतेची संतांवर खूप श्रद्धा आहे, पण भाजप ती उद्ध्वस्त करत आहे. एखादा गुंड संत कसा होऊ शकतो? आपल्या देशात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. धीरेंद्र शास्त्री भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचे समर्थन करतात. लोकांच्या टिप्पण्या संविधानाच्या कक्षेत असायला हव्यात, असे माझे मत आहे. असे संत समाजासाठी घातक आहेत, या शब्दांत सिंह यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, मंत्री तेज प्रताप यादव यांनीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर टीकास्त्र सोडले. धीरेंद्र शास्त्री येथे येऊन जातीय तेढ भडकवत असतील तर विमानतळावर आंदोलन करेन. हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन बंधुत्वाचा संदेश दिल्यानंतरच ते बिहारमध्ये प्रवेश करू शकतात, असा इशारा तेज प्रताप यादव यांनी दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"