'मला पक्षातून काढण्याची कोणाची हिंमत नाही', तेज प्रताप यादव यांचे खुले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 08:05 PM2021-10-11T20:05:24+5:302021-10-11T20:06:12+5:30
Tej Pratap Yadav : तेज प्रताप यादव यांनी जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पाटण्यात जनशक्ती यात्रा काढली.
बिहार : आरजेडी (RJD) नेता तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी आपला लहान भाऊ तेजस्वी यादव ( Tejashawi Yadav) यांच्यासोबत कोणताही वाद नसल्याचे म्हटले आहे. सध्या केवळ राजकीय लढाई लढत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तेज प्रताप यादव यांनी जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पाटण्यात जनशक्ती यात्रा काढली.
तेज प्रताप यादव हे जेपी गोलंबरपासून अनवाणी चालत आगमकुआन परिसरात असलेल्या जयप्रकाश नारायण यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर याठिकाणी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, 'आज तक'शी संवाद साधताना तेज प्रताप यांनी सांगितले की, त्यांचा तेजस्वी यांच्यासोबत कोणताही वाद नाही. तेज प्रताप यादव म्हणाले, माझा कोणाशीही वाद नाही. माझा वाद नितीशकुमार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. कुटुंब एक वेगळी जागा आहे आणि राजकीय लढा हे स्वतःचे वेगळे स्थान आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी आरजेडीचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी (Shivanand Tiwari) यांनी तेज प्रताप यादव यांची हकालपट्टी केल्याचे म्हटले होते. यावर भाष्य करताना तेज प्रताप यादव म्हणाले, जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी आणि कृष्णाचा भक्त आहे. मला पक्षातून काढण्याची कोणाची हिंमत नाही. जय प्रकाश नारायण यांचे अनुयायी आणि श्री कृष्णाचे भक्त असलेल्यांना पक्षातून कोण बाहेर काढू शकतो? असा सवालही त्यांनी केला.
शिवानंद तिवारी यांचा दावा
आरजेडी पक्षात अंतर्गत वाद सुरू आहेत. दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी तेज प्रताप यादव आरजेडीमध्ये नसल्याचा दावा केला होता. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच, तेज प्रताप यादव यांना पक्षाचे निवडणूक चिन्ह कंदील वापरण्याची परवानगी नाही, असा दावाही शिवानंद तिवारी केला.