Rabri Devi : "२ दिवसांत २२ हत्या, हे मंगलराज आहे का?"; बिहारमधील गुन्हेगारीवर राबडी देवींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 17:49 IST2025-03-17T17:49:03+5:302025-03-17T17:49:45+5:30
Rabri Devi : कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरुन माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांना घेरलं.

Rabri Devi : "२ दिवसांत २२ हत्या, हे मंगलराज आहे का?"; बिहारमधील गुन्हेगारीवर राबडी देवींचा हल्लाबोल
बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरुन माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांना घेरलं. राज्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि पोलिसांवरील हल्ल्यांवरून जोरदार निशाणा साधला. "नितीश म्हणतात की, हे सुशासनाचं सरकार आहे. कुठे आहे सुशासन? बिहारमध्ये होळी दरम्यान दोन दिवसांत २२ हत्या झाल्या आहेत. इतके पोलीस यापूर्वी कधीही मारले गेले नव्हते."
"बहिणी आणि मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली जाते. इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मारले जात आहेत. मग सामान्य लोकांचं काय होईल? सुरक्षा पुरवणाऱ्यांची हत्या केली जात आहे. हेच मंगलराज आहे का? जंगलराज म्हणतात, जंगलराजमध्ये इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मरत नव्हते" असं म्हणत राबडी देवी यांनी टीका केली आहे.
आरजेडीचे आमदार आणि मुख्य सरचिटणीस रणविजय साहू यांनी बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तेजस्वी यांचं सरकार येताच एन्काउंटर पॉलिसी लागू केली जाईल. बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. नितीश कुमार गृहखाते सांभाळू शकत नाहीत. पोलिसांचे खून होत आहेत. दगडफेक होत आहेत. सामान्य लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत असं म्हटलं आहे.
बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधी पक्ष सरकारला सभागृहापासून रस्त्यांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीमुळे विरोधी पक्ष हा मुद्दा सहजासहजी सोडत नाही. सत्तेत असलेले लोक जंगलराजची आठवण करून देण्याशिवाय दुसरं कोणतेही उत्तर देऊ शकत नाहीत. गेल्या एका आठवड्यात पोलिसांवरील सततचे हल्ले रोखणं ही सरकारसाठी एक मोठी जबाबदारी आहे. मात्र सरकारच्या काही मंत्र्यांनी म्हटलं आहे की, हे सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांचं षड्यंत्र आहे.