‘पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारे...’ राजद नेत्याचे PFIला समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 09:51 PM2022-09-25T21:51:08+5:302022-09-25T21:52:05+5:30
PFIच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील निदर्शनादरम्यान 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याची घटना घडली.
पाटणा: PFI(पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) च्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील निदर्शनादरम्यान 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याची घटना घडली. या घटनेनंतर बराच गदारोळ झाला असून, त्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, यावर बिहारमधील राजद नेते शिवानंद तिवारी यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणे हा केवळ निषेधाचा भाग आहे. याचा अर्थ असा नाही की, घोषणा देणारे पाकिस्तानी होऊन पाकिस्तानात जातील, असे वक्तव्य शिवानंद तिवारी यांनी केले आहे.
देशभरात पीएफआयच्या ठिकाणांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांच्या निषेधार्थ संघटनेने 23 सप्टेंबर रोजी पुण्यात जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. निदर्शने चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी सुमारे 40 आंदोलकांना अटक केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. त्यांनी शिंदे सरकारकडे आंदोलकांवर कठोर कारवाईची मागणी केली.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रीया
या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, अशाप्रकारच्या घोषणा महाराष्ट्रात खपवून घेतल्या जाणार नाही, असे ते म्हणाले. तर, या घोषणाबाजीत सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.