भाजपाच्या कार्यालयावर आरजेडी समर्थकांचा हल्ला
By admin | Published: May 17, 2017 05:00 PM2017-05-17T17:00:01+5:302017-05-17T17:00:01+5:30
बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला
ऑनलाइन लोकमत
पटना, दि. 17 - बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या बीर चंद पटेल रोडवरील भाजपा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली असून, अनेक गाड्यांची तोडफोडही केली आहे. या राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवारातील मिसा भारती यांच्या नावावर दिल्लीतील उच्चभ्रू परिसरामध्ये सुमारे शंभर कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे नुकतेच उघड झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागानं छापेमारीही केली होती. राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी सुनियोजित पद्धतीनं हल्ला केल्याचं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. मात्र राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी या आरोपांचं खंडन करत भाजपा कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा वीट फेकल्याचं सांगितलं. पोलिसांनी दगडफेक करणा-यांची ओळख पटवली असून, त्यांच्याविरोधात कारवाईही केली आहे.
शहर पोलीस अधीक्षक चंदन कुशवाह म्हणाले, भाजपाच्या कार्यालयावर हल्ला करणारा कोणताही व्यक्ती असो, तो वाचणार नाही. आम्ही परिसरात अतिरिक्त पोलीस बल तैनात केले आहे. भाजपानं निवडणूक आयोगाकडे लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही मुलगे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव आणि आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन केलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी गेल्या आठवड्यात लालूप्रसाद यादव, त्यांची खासदार कन्या मीसा भारती आणि दोन्ही मुलांवर 1 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्ट लँड डील्समध्ये सहभागी होण्याचा आरोप केला आहे. बिहारमधील भाजपाचे अध्यक्ष नित्यानंद यांनी राष्ट्रीय जनता दलानं नैराश्येतून कार्यालयावर हल्ला केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बिहारमधला भ्रष्टाचार आणि अराजकतेविरोधात भाजपा नेहमीच लढत राहील. आम्ही या लढाईला कोर्टासह लोकांमध्येही घेऊन जाऊ. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दलाच्या गुंडांविरोधात कारवाई केली पाहिजे, असं वक्तव्यही सुशील मोदी यांनी केलं आहे.