Tejashwi Yadav: “लाऊडस्पीकर नसताना देवाची भक्ती होत नव्हती का?”; तेजस्वी यादवांचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 02:59 PM2022-05-01T14:59:25+5:302022-05-01T15:00:52+5:30
Tejashwi Yadav: जनहिताचे खरे मुद्दे सोडून लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.
पाटणा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे पडसाद देशभरात उमटताना पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिले आहे. मात्र, यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने धडक करवाई करत तेथील बेकायदा लाऊडस्पीकर काढण्याची मोहीम हाती घेतली. या कारवाईचे राज ठाकरे यांनी कौतुकही केले. यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी लाऊडस्पीकर अस्तित्वात नव्हते तेव्हा भगवान आणि खुदा नव्हते का, अशी विचारणा केली आहे.
तेजस्वी यादव यांनी ट्विट करत यासंदर्भात भाष्य केले आहे. लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांना विचारू इच्छितो की, लाऊडस्पीकरचा शोध १९२५ मध्ये लागला आणि भारतातील मंदिरे/मशिदींमध्ये त्याचा वापर ७० च्या सुमारास सुरू झाला. जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हा भगवान आणि खुदा नव्हते का? लाऊडस्पीकरशिवाय प्रार्थना, जागरण, भजन, भक्ती आणि साधना होत नव्हती का, अशी विचारणा तेजस्वी यादव यांनी केली आहे.
अनावश्यक विषयांना धार्मिक रंग देतात
किंबहुना ज्यांना धर्म आणि कर्माचे मर्म कळत नाही, ते अनावश्यक विषयांना धार्मिक रंग देतात. स्वत:ची जाणीव असलेला माणूस या मुद्द्यांची तुलना कधीच करणार नाही. देव सदैव आपल्यासोबत असतो. तो प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कणात व्यापलेला आहे. कोणताही धर्म आणि देव कोणत्याही लाऊडस्पीकरशी बांधील नाही, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे. तसेच लाऊडस्पीकर आणि बुलडोझरवर चर्चा सुरू आहे, मात्र महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्याबाबत बोलले जात नाही. जनहिताचे खरे मुद्दे सोडून लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. याशिवाय, ज्याला शिक्षण, औषध, नोकरी, रोजगार मिळत नाही, तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, यावर चर्चा का होत नाही? अशी सवालही तेजस्वी यादव यांनी केला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. राज्य सरकारने भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आली आहे.