कमाई, पढाई, दवाईवर राजदचा भर; बिहारमध्ये तेजस्वी- नितीशकुमारांमध्ये काट्याची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 01:34 AM2020-11-01T01:34:14+5:302020-11-01T06:16:31+5:30
Bihar Assembly Election 2020 : आतापर्यंत भाजप आणि जदयू हे अजेंडा तयार करायचे आणि विरोधकही त्यावर चर्चा करायचे. मात्र, यंदा प्रथमच यात बदल झाला आहे. ही निवडणूक आता कमाई, पढाई आणि दवाई (रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधा) यावर केंद्रित झाली आहे, असे राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले.
पाटणा : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर राजदच्या नेतृत्वातील महाआघाडी आणि नितीशकुमारांच्या नेतृत्वातील आघाडी यांच्यातील लढत अधिक तीव्र झाली आहे.
आतापर्यंत भाजप आणि जदयू हे अजेंडा तयार करायचे आणि विरोधकही त्यावर चर्चा करायचे. मात्र, यंदा प्रथमच यात बदल झाला आहे. ही निवडणूक आता कमाई, पढाई आणि दवाई (रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधा) यावर केंद्रित झाली आहे, असे राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले.
भाजप आणि जदयूच्या खेळीपासून तेजस्वी हे अतिशय सावध आहेत. जंगल राज का युवराज ही मोदींची टीका असो की, लालूप्रसादांच्या कुटुंबीयांवर नितीशकुमार करत असलेली टीका असो तेजस्वी यादव हे त्याला उत्तर न देता वास्तविक प्रश्नांवर बोला असे थेट आव्हान देत आहेत.
रोजगार, गरिबांमधील शिक्षणाची परिस्थिती आणि आरोग्य यासारख्या विषयांवर तेजस्वी हे लोकांचे लक्ष आकर्षित करत आहेत.
तेजस्वी यादव यांनी दहा लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले असून, जदयू त्यावर टीका करत आहे. तेजस्वी हे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप जदयूचे नेते करत
आहेत.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि राजदचे सरकार नोकऱ्या देण्याचे आश्वासन का पूर्ण करू शकले नाही, असा सवाल जदयूचे नेते विचारत आहेत.