...हे माझं अपयश आहे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रांजळपणे दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 03:09 PM2019-12-17T15:09:58+5:302019-12-17T15:13:11+5:30
देशात 30 टक्के बोगस परवाने आहेत. परवाने देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी लागणार आहे
नवी दिल्ली - देशात होणारे रस्ते अपघात अन् त्यातील जीवितहानी रोखू शकलो नाही हे माझ्या मंत्रालयाचं आणि माझं अपयश आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कबुली दिली आहे. आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना गडकरींनी एका सत्रात हे विधान केलं आहे. त्याचसोबत देशातील नवीन रस्ते योजनांबाबतही गडकरींनी दिलखुलास उत्तरं दिली.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, 12 तासांच्या आत दिल्ली मुंबईचा पल्ला गाठणं शक्य होणार आहे. या महामार्गाचं काम सुरु आहे. गेल्या 5 वर्षात आमच्या मंत्रालयाने अनेक क्षेत्रात यश मिळविले. पण मागील 5 वर्षात रस्ते दुर्घटना कमी करण्यास अपयश आले. प्रत्येक वर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतात. मृतांपैकी 18-35 या वयोगटातील जवळपास 65 टक्के लोक आहेत. नवीन मोटार वाहन कायदा एक वर्षापासून राज्यसभेत अडकला होता. तो अलीकडेच पारित झाला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच देशात 30 टक्के बोगस परवाने आहेत. परवाने देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी लागणार आहे. एक व्यक्ती तीन वेगवेगळ्या शहरांमधील परवाने ठेवतो. त्याचसोबत बस ड्रायव्हरला चांगले प्रशिक्षण देणं गरजेचे आहे. 50 लोकांना बसमध्ये बसवून तो गाडी चालवत असतो. त्यामुळे आम्ही प्रशिक्षण शाळा उघडण्याची तयारी करतोय. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा म्हणून दंडाची रक्कम वाढविली आहे या भीतीमुळे वाहन चालक रस्त्यावर गाडी चालविताना वाहतूक नियमांचे पालन करेल असंही नितीन गडकरींनी सांगितले.
दरम्यान, पाच कोटी रोजगारनिर्मिती करण्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही 40 किलोमीटर प्रतिदिन असं रस्ते बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. आता 32 किमी असं सुरु आहे. यावर्षी 40 किमी होईल. तसेच 5 कोटी रोजगार निर्मिती करण्याचं ध्येय आमचं आहे. नवीन नवीन योजनांच्या माध्यमातून रोजगारासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे. आव्हानात्मक स्थिती असूनही आम्ही मार्ग काढण्याचं काम करतोय. यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.