राजस्थानमध्ये भीषण अपघात, बसने लोकांना चिरडलं; 5 जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 05:22 PM2023-09-24T17:22:16+5:302023-09-24T17:22:59+5:30
एका बसने प्रथम पादचाऱ्यांना चिरडले आणि नंतर टेम्पोला धडक दिली. या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील महवा पोलीस स्टेशन परिसरात भीषण अपघात झाला. एका बसने प्रथम पादचाऱ्यांना चिरडले आणि नंतर टेम्पोला धडक दिली. या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ झाला. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. मृतांमध्ये तीन पादचाऱ्यांचा समावेश आहे तर अन्य दोघे टेम्पोमधील प्रवासी होते.
जखमींना महुआ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जयपूरला रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंडौन रोडवरील गाझीपूरजवळ दुपारी हा अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा काही यात्रेकरू रस्त्याच्या कडेने धार्मिक स्थळी जात होते, असे सांगितले जात आहे. त्याचवेळी एका बसने या पादचाऱ्यांना चिरडले. त्यानंतर बसने तेथून जाणाऱ्या एका टेम्पोलाही धडक दिली.
अपघात होताच उपस्थित लोकांनी तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती दिली आणि नंतर जखमी आणि मृतांची काळजी घेतली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमींपैकी एकाची गंभीर प्रकृती पाहता प्राथमिक उपचारानंतर त्याला जयपूरला रेफर करण्यात आले.
अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. अपघातामुळे घटनास्थळी बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी मृतदेह स्थानिक रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.