इथे ओशाळली माणुसकी! २० मिनिटं 'तो' रक्ताच्या थारोळ्यात पडलेला; लोक काढत होते Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 13:37 IST2024-08-30T13:32:04+5:302024-08-30T13:37:46+5:30
माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एक तरुण रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. रस्त्यावरून जाणारी प्रत्येक व्यक्ती जखमी तरुणाला पाहत होती.

इथे ओशाळली माणुसकी! २० मिनिटं 'तो' रक्ताच्या थारोळ्यात पडलेला; लोक काढत होते Video
गाझियाबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. आयपीईएम कॉलेजजवळ एक तरुण रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. रस्त्यावरून जाणारी प्रत्येक व्यक्ती जखमी तरुणाला पाहत होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी थांबली होती. पण गर्दीत असलेलं कोणीच त्या जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी पुढे आलं नाही. तरुण जीवन-मृत्यूशी झुंज देत होता आणि लोक त्याचा व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते.
प्रभात कुमार असं गाझियाबाद घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. लोक जमलेले पाहून कॉन्स्टेबल सोनू सिंह तिथे पोहोचले. सोनू यांनी वेळ न वाया घालवता जखमी प्रभातला उचलून जवळच्या रुग्णालयात नेलं, जिथे प्रभातवर आता उपचार सुरू आहेत. कॉन्स्टेबलने दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेथून काही मीटर अंतरावर ते ड्युटी करत होते. लोकांची गर्दी पाहून ते पुढे आले. सर्व लोक पाहत होते पण कोणीच मदतीसाठी पुढे आलं नाही.
जखमी प्रभातवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, त्याला रुग्णालयात आणण्यास आणखी काही क्षणांचा विलंब झाला असता तर त्याला वाचवणं फार कठीण झालं असतं. या अपघातात प्रभातच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. रस्त्याच्या कडेला तो जखमी अवस्थेत पडल्याने खूप रक्तस्त्राव झाला होता. कॉन्स्टेबल सोनू यांनी त्याचा जीव वाचवला आहे.
रस्त्याच्या मधोमध कोणाचा जीव गेला तरी लोकांना काही फरक पडत नाही. प्रभातला वेळीच रुग्णालयात नेण्यासाठी सोनू यांनी वाहनचालकांना थांबण्याचा इशारा केला. मात्र कोणीही थांबायला तयार झालं नाही. अखेर एका ऑटो चालकाच्या मदतीने प्रभातला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.