Road Accident: पोलिसांच्या कारचा भीषण अपघात, 4 पोलिस आणि एका आरोपीचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:12 AM2022-02-15T11:12:17+5:302022-02-15T11:12:50+5:30
गुजरात पोलिसांची कार दिल्लीहून एका आरोपीला घेऊन गुजरातकडे जात असताना राजस्थानच्या जयपूरमध्ये अपघात झाला.
जयपूर: राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील कोतपुतली भागात सोमवारी मध्यरात्री एक मोठा अपघात झाला. भाब्रू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक फॉर्च्युनर कार दुभाजकावरील झाडावर आदळली. या अपघातात चार पोलिस आणि एका आरोपीचा मृत्यू झाला. ही कार दिल्लीहून गुजरातकडे जात होती. अपघातात ठार झालेले सर्व पोलिसगुजरात पोलिसांचे होते. भाब्रू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंझार मोरजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. त्यावेळी गुजरात पोलिसांचे चार पोलीस दिल्लीहून एका आरोपीला पकडल्यानंतर कारने परत गुजरातला जात होते. दरम्यान, भाब्रू परिसरात निंजार वळणावर त्यांची कार अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकावरील झाडावर आदळली. या अपघातात कारमधील चार पोलिस आणि आरोपीचा मृत्यू झाला.
अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही
अपघाताची माहिती मिळताच भाब्रू पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली. पोलिसांनी सर्व मृतदेह स्थानिक शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. हा अपघात कसा झाला हे अद्याप समोर आलेले नाही. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज आहे. भाब्रू पोलिसांनी गुजरात पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. भाब्रू पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.