सरकार दररोज बांधणार ३० कि़मी.चा रस्ता- गडकरी
By admin | Published: May 21, 2015 12:32 AM2015-05-21T00:32:14+5:302015-05-21T08:32:40+5:30
पायाभूत विकासाला गती देण्यासाठी यावर्षी ३ लाख कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पाचे कंत्राट देण्याची सरकारची योजना आहे.
नवी दिल्ली : पायाभूत विकासाला गती देण्यासाठी यावर्षी ३ लाख कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पाचे कंत्राट देण्याची सरकारची योजना आहे. महामार्ग उभारण्याची गती दुप्पट करून दररोज ३० किलोमीटरचा रस्ता तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, अशी माहिती महामार्ग आणि मार्ग परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
वृत्तसंस्थेला मुलाखत देताना गडकरी म्हणाले की, मागच्या वर्षी मे महिन्यात केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा रस्ते तयार करण्याची गती प्रतिदिन २ किलोमीटर होती. आज प्रतिदिन १२ किलोमीटर आहे. मेअखेर या कामाची गती प्रतिदिन १४ किलोमीटरपर्यंत जाईल.
दोन वर्षांत दररोज ३० किलोमीटर रस्ता बांधण्याचे उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय महामार्ग विकास आणि विस्तार योजनासोबत यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही तीर्थक्षेत्रे एकमेकांशी जोडण्यसाठी १,००० किलोमीटरची चारीधाम यात्रा प्रकल्प सुरु करण्याचाही मानस असून यासाठी अंदाजे ११ हजार कोटींचा खर्च येईल, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.
राजधानी दिल्लीतील वर्दळ कमी करण्यासाठी लवकरच बाह्यवळण (बाय-पास) प्रकल्प हाती घेण्यात येणार असून दिल्लीतीन आयटीओपासून ते उत्तर प्रदेशातील डासनापर्यंत १६ पदरी महामार्गाचे काम तीन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे महामार्ग-२४ वरील वाहतुकीची कोंडी दूर होईल.