असंवेदनशीलतेचा कळस! रस्त्याचं बांधकाम करताना कुत्र्यावर ओतलं डांबर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 04:46 PM2018-06-13T16:46:46+5:302018-06-13T16:46:46+5:30
जिवंत कुत्र्यावर बांधकाम मजुरांनी डांबर ओतल्याचा स्थानिकांचा आरोप
आग्रा : फतेहबादमध्ये रस्त्याचं काम करताना एका कुत्र्यावर गरम डांबर ओतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. काल रात्री रस्त्याचं काम करण्यात आलं. त्यावेळी हा कुत्रा जिवंत होता, असा दावा स्थानिकांनी केला आहे. कुत्रा जखमांनी व्हिवळत होता, त्यामुळे त्याला जागेवर उठता येत नव्हतं. मात्र याकडे दुर्लक्ष करत बांधकाम मजूरांनी त्याच्यावर गरम डांबर ओतलं, असा आरोप स्थानिकांनी केला.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते नरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर. पी. इन्फ्राव्हेन्चर प्रायव्हेट कंपनीनं या रस्त्याचं काम केलं आहे. याप्रकरणी कंपनीला नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती कुमार यांनी दिली. मात्र या कंपनीनं अहवालात दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. रस्त्याचं काम रात्री सुरू असल्यानं अतिशय अंधार होता. त्यामुळे आम्हाला कुत्रा दिसलाच नाही, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
फूल सय्यद क्रॉसिंगपासून सर्किट हाऊसपर्यंतच्या रस्त्याचं नव्यानं डांबरीकरण करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नरेश पारस यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. 'डांबरीकरणाचं काम सुरू असताना कुत्रा रस्त्याच्या कडेला होता. तो कुत्रा जखमी अवस्थेत असल्यानं त्याला उठताही येत नव्हतं. मात्र त्याला बाजूला करण्याऐवजी बांधकाम मजूरांनी त्याच्यावर गरम डांबर ओतलं. त्यानंतर त्याच्यावरुन रोड रोडरोलरदेखील फिरवण्यात आला,' असं पारस म्हणाले.