आग्रा-लखनऊ महामार्गावर रस्ता खचला, 50 फूट खोल खड्ड्यात कोसळली एसयूव्ही कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 04:41 PM2018-08-01T16:41:43+5:302018-08-01T16:41:55+5:30
उत्तर प्रदेशमधल्या आग्रा-लखनऊ या महामार्गावरचा रस्ता आज सकाळी अचानक खचला.
आग्रा- उत्तर प्रदेशमधल्या आग्रा-लखनऊ या महामार्गावरचा रस्ता आज सकाळी अचानक खचला. त्याच दरम्यान भरधाव वेगानं येणारी एक एसयूव्ही कार रस्ता खचून तयार झालेल्या खड्ड्यात पडली. हा खड्डा 50 फूट खोल असल्यानं कार त्यात जाऊन अडकली. कार सरळ खड्ड्यात जाऊन अडकली असून, कारमधील लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आलं.
ही घटना बुधवारी सकाळी डोकी परिसरातल्या वाजिदपूर पुलिया येथे घडली आहे. यावेळी कारमध्ये चार जण बसले होते. मुंबईहून ते कन्नोजला येत होते. अपघातातून थोडक्यात बचावलेले लोक कन्नोजचे रहिवासी आहेत. ते मुंबईतून कार खरेदी करून परतत होते. त्यांच्याबरोबर कुटुंबातील तीन सदस्यही होते. त्यांना रस्ता माहीत नसल्यानं ते जीपीएसच्या मदतीनं महामार्गावर गाडी चालवत होते. त्याच वेळी अचानक नेटवर्क गेलं आणि जीपीएस बंद झालं. जीपीएस बंद झाल्यानं ते सर्व्हिस रोडवर आले, दरम्यान त्यांच्या गाडीचा वेग भरधाव होता. त्यामुळेच सर्व्हिस रोडवर त्यांना कोणताही खड्डा दिसला नाही.
ब्रेक लावण्याच्या आधीच त्यांची गाडी 50 फूट खोल खड्ड्यात कोसळली आणि अडकली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य राबवत कारमधील माणसांना सुखरूप बाहेर काढलं. समाजवादी पक्षानं हा आग्रा-लखनऊ महामार्ग बनवला आहे. अवघ्या 22 महिन्यांत हा महामार्ग तयार करण्यात आला असून, त्याला 13,200 कोटी रुपये खर्च आला आहे. हा महामार्ग 302 किलोमीटर लांब आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या महामार्गाचं उद्घाटन केलं होतं.
A portion of service Lane about 16 kms from Agra caved in this morning after heavy rains and accumulation of water on the stretch pic.twitter.com/eyrNllGY7F
— TIMES NOW (@TimesNow) August 1, 2018