रोड टॅक्स वाढविल्यामुळे नऊ राज्यांत कार महागल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 03:57 AM2019-09-18T03:57:28+5:302019-09-18T03:57:35+5:30
आधीच मंदीने ग्रासलेल्या वाहन उद्योगाला नऊ राज्यांनी रोड टॅक्स वाढवून आणखी एक दणका दिला आहे.
मुंबई/नवी दिल्ली : आधीच मंदीने ग्रासलेल्या वाहन उद्योगाला नऊ राज्यांनी रोड टॅक्स वाढवून आणखी एक दणका दिला आहे. रोड टॅक्समध्ये वाढ झाल्यामुळे या राज्यांतील प्रवासी वाहनांच्या किमती वाढल्या असून, त्याचा परिणाम म्हणून वाहन विक्री आणखी घटली आहे.
रोड टॅक्समध्ये वाढ करणाऱ्या राज्यांत पंजाब, केरळ, जम्मू-काश्मीर आणि बिहार यांचा समावेश आहे. मारुती सुझुकीच्या उपलब्ध आकडेवारीवरून असे दिसते की, रोड टॅक्स वाढल्यामुळे वाहनांच्या किमती ५ हजार ते ५७ हजार रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
सूत्रांनी सांगितले की, जम्मू-काश्मिरातील रोड टॅक्समुळे (९ टक्के) मारुती सुझुकीच्या आॅल्टो८०० कारची किंमत २२,९०० रुपयांनी वाढली आहे. सुरक्षा व उत्सर्जन नियमांच्या पालनासाठी गुंतवणूक करावी लागल्यामुळे गाडीची एकूण किंमत ६३ हजारांनी वाढली आहे. सियाजची किंमत ९८ हजारांनी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून आॅल्टोची विक्री २७ टक्क्यांनी घसरली आहे.
याशिवाय या वित्त वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत पंजाबात छोट्या कारची विक्री २८ टक्क्यांनी, बिहारात २७ टक्क्यांनी आणि उत्तराखंडमध्ये २६ टक्क्यांनी घसरली आहे.
>अशाने वाहनांची विक्री घटणारच
मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सांगितले की, आॅल्टोसारख्या गाड्यांच्या किमतीही ४५ ते ५० हजार रुपयांनी वाढवाव्या लागत असतील तर दुसरी काय अपेक्षा केली जाऊ शकते? विक्री घटणारच. विक्री आधीच कमी झालेली असताना राज्ये रोड टॅक्स ५ टक्क्यांपर्यंत वाढवीत आहेत. वाढलेल्या किमती, कर्ज सुविधांची अत्यल्प उपलब्धता आणि सुरुवातीला जमा कराव्या लागणाºया रकमेतील वाढ याचा एकत्रित परिणाम म्हणून कारच्या किफायतशीरपणावर परिणाम होणे अटळ आहे.