अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते चांगले- शिवराज सिंह चौहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:17 AM2017-10-26T04:17:34+5:302017-10-26T04:17:40+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सध्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. अमेरिकेतून मध्य प्रदेशात गुंतवणूक यावी, यासाठी ते तिथे अनेकांची भेटी घेत आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सध्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. अमेरिकेतून मध्य प्रदेशात गुंतवणूक यावी, यासाठी ते तिथे अनेकांची भेटी घेत आहेत. तेथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या विधानामुळे अमेरिकेत नसली तरी भारतात खळबळ माजली आहे. अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते चांगले आहेत. मी वॉशिंग्टन विमानतळावर उतरल्यानंतर कारने जो प्रवास केला, त्यातून माझ्या हे लक्षात आले, असं ते म्हणाले. अमेरिकेतील एखाद्या रस्त्याच्या अनुभवातून तेथील सर्वच रस्त्यांविषयी सरसकट हे विधान त्यांनी केलं.
एक खरं आहे की अमेरिकेतील अन्य राज्यांपेक्षा वॉशिंग्टनमधील रस्ते काहीसे वाईट आहेत. तेही सर्व नव्हे, तर काही भागांतील. तिथलं प्रशासनही ते मान्य करतं. ते का वाईट आहेत, याच्या मुळात जायचं कारण नाही. पण मध्य प्रदेशातील रस्ते देशातील अन्य राज्यांपेक्षा चांगले असले तरी ते अतिशय उत्तम आहेत, असं नाही. शिवाय मध्य प्रदेशातील काही रस्ते तर भलतेच खराब आहेत.
त्यामुळेच शिवराज सिंह चौहान यांच्या या विधानावर सोशल मीडियावर टीका झाली. अनेकांनी तर त्यांची टिंगल करताना मध्य प्रदेशातील काही रस्त्यांचे फोटोही टाकले आहेत. एक रस्ता तर पाण्यात बुडाल्याने मुख्यमंत्र्यांना त्यांचे सुरक्षा कर्मचारी उचलून नेत आहेत, असाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.