रॉबर्ट वाड्रावरील आरोप राजकीय आकसापोटी - काँग्रेस
By admin | Published: April 29, 2017 06:44 PM2017-04-29T18:44:12+5:302017-04-29T18:48:11+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी 2008 मध्ये हरियाणातील जमीन व्यवहारात 50.5 कोटी रुपयांचा अवैध नफा कमावल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी 2008 मध्ये हरियाणातील जमीन व्यवहारात 50.5 कोटी रुपयांचा अवैध नफा कमावल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. याप्रकरणी भूमिका मांडण्यासाठी काँग्रेस पार्टीकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर निशाणा साधण्यात आला.
यावेळी, "राजकीय दुश्मनी काढण्यासाठी भाजपा इतक्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचेल, यावर विश्वास बसत नाही", असा आरोप काँग्रेसने आयोजित पत्रकार परिषदेत भाजपावर केला आहे.
शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, "भाजपा विरोधकांच्या भूमिकेत असताना त्यांच्या कित्येक नेत्यांविरोधात पुरावे होते, भाजपा नेत्यांच्या नातेवाईकांविरोधात पुरावे होते, मात्र आम्ही कधीही त्यांचा छळ केला नाही".
"आम्हाला हेदेखील माहिती होते कोणते उद्योगपती भाजपाला पाठिंबा देत आहेत आणि त्यांच्या पार्टीला फंड देतात. मात्र काँग्रेसनं कधीही त्यांच्याविरोधात छापेमारी सत्र चालवले नाही. भाजपाकडून राजकीय आकसापोटी हा सर्व प्रकार सुरू आहे", असा आरोपही यावेळी आझाद यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी २००८ मध्ये हरियाणातील जमीन व्यवहारात ५०.५ कोटी रुपयांचा अवैध नफा कमावला होता. एका इंग्रजी वृत्तपत्रात हा दावा करण्यात आला आहे. या व्यवहारासाठी दमडीही खर्च न करता वाड्रा यांनी नफा कमावल्याचे जस्टिस एस. एन. ढिंगरा आयोगाने मान्य केले.
वाड्रा यांच्या कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी हातमिळवणी करण्यात आली होती. आयोगाने वाड्रा आणि त्यांच्या कंपन्यांच्या जमीन खरेदीची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. ढिंगरा आयोगाच्या अहवालाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. वाड्रा यांचे वकील सुमन खेतान यांनी वृत्तपत्राला सांगितले की, आपले पक्षकार आणि त्यांच्या कंपन्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही, तसेच कायद्याचे उल्लंघनही झालेले नाही.
बाजारमूल्य दिल्यानंतर जमीन खरेदी करण्यात आली, तसेच आयकरही भरण्यात आला. हरियाणातील भाजप सरकारने वाड्रा यांच्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्यासाठी २०१५ मध्ये ढिंगरा आयोगाची स्थापना केली होती. वाड्रा आणि त्यांची कंपनी स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने गुरगाव येथे बेकायदेशीररीत्या जमिनीचे खरेदी व्यवहार केल्याचा आरोप आहे. वाड्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत. राजकीय सुडापोटी आपले नाव गोवले जात असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले.