अमेरिका, नेदरलँडसह कुठेही जा, पण लंडनला नको! रॉबर्ट वड्रांना परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 12:29 PM2019-06-03T12:29:06+5:302019-06-03T12:31:12+5:30
सीबीआय विशेष न्यायालयामध्ये वड्रांच्या वकिलाने लंडनला जाण्याची अनुमती मागितली होती.
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशी सुरु असलेले काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रांना उपचारांसाठी सहा आठवडे परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सीबीआय विशेष न्यायालयामध्ये वड्रांच्या वकिलाने परदेशात जाण्याची अनुमती मागितली होती. यावर ईडी आणि सीबीआयने आक्षेप घेतला होता. मात्र, वैद्यकीय कारणासाठी न्यायालयाने वड्रांना परवानगी दिली आहे.
वड्रांनी लंडनला जाण्याची परवानगी देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. मात्र, न्यायालयाने अमेरिका, नेदरलँडला जाण्याची परवानगी देताना लंडनला जाण्याची विनंती फेटाळली आहे. यामुळे वड्रा यांनी ही मागणी मागे घेतली आहे. यानंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधात काढण्यात आलेली लूक आऊट नोटीस या सहा आठवड्यांच्या काळात निलंबित राहणार असल्याचे म्हटले आहे.
Robert Vadra has been allowed by Court to travel to USA and Netherlands but he can't travel to London. Vadra withdrew his travel request to London. Court has said in case any look out circular is issued, it will remain suspended during this period. https://t.co/rSydMErnI5
— ANI (@ANI) June 3, 2019
दरम्यान, परदेशात अवैध संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांनी गुरुवारी चौकशीसाठी हजर राहावे, असे समन्स अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नव्याने बजावले आहेत. वाड्रा यांनी ईडीच्या तपास अधिकाऱ्यांपुढे सकाळी साडेदहा वाजता हजर राहावे लागणार आहे. त्यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामीन घेतला आहे. गेल्या आठवड्यात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयास हा जामीन रद्द करावा, असा अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने वाड्रा यांना त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. ईडीने आपणास याच खटल्यात अनेकदा गुंतविल्याचा वाड्रा यांचा दावा आहे, तर तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना ताब्यात घेणे आवश्यक आहे, असे ईडीचे म्हणणे आहे.
आतड्यातील ट्यूमरच्या उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. यापूर्वी त्यांनी ईडीकडेसुद्धा परदेशात जाण्यास परवानगी देण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने ३ जूनपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला होता.