रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:28 AM2019-05-30T04:28:50+5:302019-05-30T04:29:00+5:30

परदेशात अवैध संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांनी गुरुवारी चौकशीसाठी हजर राहावे, असे समन्स अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नव्याने बजावले.

Robert Vadra orders to be present for inquiry | रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

googlenewsNext

नवी दिल्ली : परदेशात अवैध संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांनी गुरुवारी चौकशीसाठी हजर राहावे, असे समन्स अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नव्याने बजावले. वाड्रा कॉँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आहेत.
वाड्रा यांनी ईडीच्या तपास अधिकाऱ्यांपुढे सकाळी साडेदहा वाजता हजर राहावे लागणार आहे. त्यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामीन घेतला आहे. गेल्या आठवड्यात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयास हा जामीन रद्द करावा, असा अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने वाड्रा यांना त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. ईडीने आपणास याच खटल्यात अनेकदा गुंतविल्याचा वाड्रा यांचा दावा आहे, तर तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना ताब्यात घेणे आवश्यक आहे, असे ईडीचे म्हणणे आहे. ज्या न्यायालयाने वाड्रा यांना अटकपूर्व जामीन देऊन दिलासा दिला, त्या न्यायालयाने या प्रकरणाच्या गांभीर्याबद्दल चर्चा केलेली नाही, असा दावा ईडीने न्यायालयात केला. लंडनमध्ये कोट्यवधी रुपयांची (१.९ अब्ज ब्रिटीश पौंड) जागा खरेदी करण्यासाठी वाड्रा यांनी अवैध सावकारी मार्गाने जमा केलेल्या पैशांचा वापर केला, असा ईडीचा संशय आहे. वाड्रा यांनी लंडनमध्ये खरेदी केलेल्या अनेक नव्या मालमत्तांची माहिती आपल्याला असल्याचे ईडीतर्फे न्यायालयास सांगण्यात आले.
>लंडनला जाण्याच्या तयारीत
रॉबर्ट वाड्रा यांनी दिल्ली येथील न्यायालयात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे. आतड्यातील ट्यूमरच्या उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे. यापूर्वी त्यांनी ईडीकडेसुद्धा परदेशात जाण्यास परवानगी देण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने ३ जूनपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला आहे. ही सुनावणी ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयापुढे झाली.

Web Title: Robert Vadra orders to be present for inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.