रोबोटिक्स स्पर्धेत ‘रोबोनिस्ट’ अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 01:57 AM2019-09-25T01:57:13+5:302019-09-25T01:57:19+5:30
प्रतिभेचा शोध; जागतिक स्पर्धेत औरंगाबादच्या विद्यार्थ्यांची कामगिरी
नवी दिल्ली : जिकडे पाहावे तिकडे रोबोट्स. विद्यार्थ्यांच्या हाती ड्रोन, रॉकेट्स... छोटीशी मोटर, रिमोट कंट्रोल, वायर्स अशा वस्तूंसह असंख्य मुले-मुली रोबोटिक्सच्या जादुई विश्वात रमली आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक रोबोटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या रोबोनिस्टच्या टीमने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
आॅल इंडिया कॉन्सिल फॉर रोबोटीक्स आॅटोमेशनच्या वतीने पाचव्यांदा 'जागतिक रोबोटीक्स अजिंक्यपद स्पर्धा - टेक्नोशियान २०१९' आयोजित करण्यात आली आहे. त्यात २० देशांमधून २८ हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. २३ सप्टेंबरला सुरु झालेल्या या स्पर्धेचा बुधवारी समारोप होईल.
रोबोटीक्स म्हणजे रोजचे जगणे सुलभ करणाऱ्या मशिन्सचे विज्ञान, अशी सहज व्याख्या करणारा विद्यार्थी श्रीवर्धन टाकळकर महिनाभरापासून मित्रांसह रोबोटमय झाला. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी औरंगाबादमध्येच तयारी केली. शाळा संपल्यावर दुपारचा वेळ, शनिवार-रविवारची सट्टी रोबोट बनवण्यात घालवली.
बंदीस्त शाळेबाहेर रोबोटीक्सचे शिक्षण देण्यासाठी धडपडणारे रोबोनिस्ट टेक सोल्युशन्स प्रा. लि.चे दीपक कोलते व त्यांच्यासारखेच इंजिनिअर मित्र आणि त्यांची वीस जणांची टीम स्पर्धेत सहभागी झाली आहे. कोलते म्हणाले, यातून जागतिक स्पर्धेचा अनुभव मुलांना मिळतो. विज्ञान-तंत्रज्ञान जे शाळेत शिकतो ते प्रत्यक्ष इथे वापरता येते. स्पर्धेसाठी रोबोट तयार केला. त्याची लांबी, रुंदी, वजन, आकार ठरवून देण्यात आला. आम्ही मुलांना कामे नेमून दिलीत. प्रत्येकाने त्याचे काम चोख बजावले.
रोबोट्स स्पर्धेत एका मार्गावर रोबो चालवून दाखवावा (रोबो रेस) लागतो. त्यावर असंख्य अडथळे असतात. ते पार करायचे. आम्हाला अडथळे लक्षात आले. ऐनवेळी बदल करणे शक्य नव्हते. आमच्या रोबोटच्या चाकांमध्ये छोटीशी जागा होती. आम्ही त्यात माचिसच्या काड्या बसवल्या, अशा ट्रीक्स वापरल्याचे नमूद करुन कोलते म्हणाले, आम्हाला 'क्रिएटीव्ह ब्रेन' तयार करायचे आहेत. त्यासाठी स्पर्धांचे जास्तीत जास्त आयोजन व्हायला हवेत. जिल्हा- राज्य- राष्ट्रीय व नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल तर सर्वच स्तरातील मुला-मुलींना त्यात सहभागी होता येईल. विद्यार्थी आसीम म्हणाला, स्पर्धेसाठी खूप तयारी केली. नियम समजावून घेतले. लांबी-रुंदी, वजनानुसार कोणती मोटर रोबोटमध्ये असेल, याचाही विचार केला.
टीम रोबोनिस्ट : दीपक कोलते, अभिजित बोडके, मोझेस खरात, चेतन पवार, प्रदीप सहाने, निमिष पाटणी, सनी सुखदे, अश्विन पाटील.
सहभागी स्पर्धक : आर्यवीर दर्डा, आंचल सक्सेना, कौस्तुभ कुलकर्णी, ओंकार गोरडे, नील मपारी, आसीम राक्षसभुवनकर, सिद्धांत शर्मा, प्रणव वेदपाल, समर जोशी, पी.एस. प्रत्युक्ष, रिद्धिमा तुलशन, पृथ्वीर गाडेकर, शुभम कागलीवाल, रेयांश माछार, श्रीवर्धन , मैत्रैय दुसाने व योगेश मोरे.