रोबोटनं वाचवले रिक्षाचालकाचे प्राण
By admin | Published: May 17, 2017 06:25 PM2017-05-17T18:25:56+5:302017-05-17T18:25:56+5:30
आशिया खंडातली पहिली शस्त्रक्रिया. पर्किन्सन्सच्या आजारावर आणि परिस्थितीवर केली मात
Next
- मयूर पठाडे
पर्किन्सन या आजारानं काय होतं माहीत आहे? अंग थरथरतं, मेंदूवर परिणाम होतो, अंगातली शक्ती जाते. कोणतंच काम धडपणानं जमत नाही. स्मृतीही बर्यापैकी जाते आणि अनेकदा तर कोणाला ओळखणंही मुश्कील होतं. भारतातही अनेक मान्यवरांना या आजाराला सामोरं जावं लागलं आहे. केरळ राज्यातल्या थ्रिसूर इथला एक साधा रिक्षा ड्रायव्हर. त्यालाही याच आजारानं ग्रासलं होतं. त्याचं सगळं कुटुंबच त्यामुळे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती, पण एका रोबोटनं त्याला वाचवलं आणि त्याचं आयुष्य पुन्हा मार्गावर आलं. या रोबोटला तो आता मनापासून धन्यवाद देतोय.
पर्किन्सनसारख्या आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णाला रोबोटनं वाचवल्याची आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची ही घटना संपूर्ण देशातच नव्हे, आशिया खंडातली पहिलीच घटना आहे.
या शस्त्रक्रियेचं वैशिष्ट्य म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी एका रोबोटची मदत घेण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी इतकी अचूकता लागते की मानवी हातांनी इतकी अचूकता येणं शक्यच नाही. रोबोटनं ही शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. आशिया खंडातली अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. डीप ब्रेन स्टिम्युलेशनची (डीबीएस) ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट मानली जाते.
या शस्त्रक्रियेमुळे 45 वर्षीय रिक्षाचालक झुबीरला नव्यानं आयुष्य मिळालं आहे. आता तो पूर्वीप्रमाणेच आपली रिक्षा चालवू शकेल आणि त्याच्या रिक्षा चालवण्यामुळे कोणाचाही जीव धोक्यात येणार नाही.
झुबीरची परिस्थिती पाहता या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयानं त्याच्याकडून पाच पैशाचीही फी घेतली नाही.
वैद्यकीय क्षेत्रात आता मोठय़ा प्रमाणात रोबोट येताहेत आणि रुग्णांना त्यामुळे जीवदान मिळू लागलं आहे.