'रॉकेट वुमन' यांच्याकडे चंद्रयान-३ मिशनची जबाबदारी; कोण आहेत रितू करिधाल?, जाणून घ्या...!

By मुकेश चव्हाण | Published: July 14, 2023 08:16 AM2023-07-14T08:16:22+5:302023-07-14T08:31:45+5:30

Chandrayaan 3 Launch : चंद्रयान ३च्या मिशन डायरेक्टरच्या भूमिकेत रितू करिधाल दिसणार आहे.

'Rocket Woman' responsible for Chandrayaan-3 mission; Who is Ritu Karidhal Shrivastava?, lets Know about him | 'रॉकेट वुमन' यांच्याकडे चंद्रयान-३ मिशनची जबाबदारी; कोण आहेत रितू करिधाल?, जाणून घ्या...!

'रॉकेट वुमन' यांच्याकडे चंद्रयान-३ मिशनची जबाबदारी; कोण आहेत रितू करिधाल?, जाणून घ्या...!

googlenewsNext

नवी दिल्ली: सर्व देशवासीयांचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-३च्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेईकल मार्क-३ (एलव्हीएम-३) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावर सज्ज झाले आहे. आज दुपारी २.३५ वाजता चंद्रयान अवकाशात झेपावणार असून, आतापर्यंत या रॉकेटने १०० टक्के यशस्वी प्रक्षेपण केले आहे. प्रक्षेपण तर यशस्वी होणारच; पण पुढे चंद्रावर ऐतिहासिक लॅण्डिंगच्या यशाबद्दलही शास्त्रज्ञ आशावादी आहेत. 

चंद्रावर यशस्वी लॅण्डिंग झाल्यास भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश ठरेल. २३ ऑगस्टनंतर कधीही हे यान चंद्रावर उतरू शकते. चांद्रयान -३ च्या उड्डाणासाठी इस्रोने एलव्हीएम ३ प्रक्षेपक विकसित केले आहे. देशातील आतापर्यंतचे हे सर्वात अवजड आणि अद्ययावत प्रक्षेपक आहे. त्याचे वजन ६४० टन इतके आहे. 'रॉकेट वुमन' म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंतराळ शास्त्रज्ञ रितू करिधाल श्रीवास्तव या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. जाणून घ्या कोण आहे रितू करिधाल, ज्यांच्यावर या महत्त्वाच्या मिशनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

चंद्रयान ३च्या मिशन डायरेक्टरच्या भूमिकेत रितू करिधाल दिसणार आहे. मंगळयान मोहिमेत आपले कौशल्य दाखविणाऱ्या रितू या चंद्रयान-३ सह यशाचे आणखी एक उड्डाण घेणार आहे. रितू करिधाल श्रीवास्तव यांच्या याआधीच्या मिशनमधील भूमिका लक्षात घेऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे. रितू या मंगळयान मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या. त्यावेळी त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. रितू करिधाल लखनौमध्ये वाढल्या. त्यांनी लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एमएससी केले आहे. विज्ञान आणि अवकाशातील आवड पाहून रितू यांनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. यानंतर रितूने इस्रोमध्ये नोकरीला सुरुवात केली. एरोस्पेसमध्ये पारंगत असलेल्या रितू यांचे करिअर यशांनी भरलेले आहे. रितू यांना २००७ मध्ये यंग सायंटिस्ट अवॉर्डही मिळाला आहे. वेगवेगळ्या मोहिमांमध्ये त्यांच्या भूमिकेसाठी देशातील आघाडीच्या अवकाश शास्त्रज्ञांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट आहे. रितू यांना 'रॉकेट वुमन' या नावानेही ओळखले जाते.

रितू करिधाल यांनी अनेक मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे

रितू करिधाल यांनी मिशन मंगलयान आणि मिशन चांद्रयान-२ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रितू करिधल यांना लहानपणापासूनच अंतराळ आणि अवकाश शास्त्रात रस होता. रितू यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी तिच्या कामगिरीइतकीच मोठी आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यंग सायंटिस्ट अवॉर्ड, मार्स आर्बिटर मिशनसाठी इस्रो टीम अवॉर्ड, एएसआय टीम अवॉर्ड, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीजचा एरोस्पेस वुमन अचिव्हमेंट अवॉर्ड, रितू या समर्पण आणि कामाप्रती आवड यासाठी तिच्या समवयस्कांमध्ये ओळखले जातात.

यावेळी ऑर्बिटर पाठवणार नाही-

चंद्रयान-३ मध्ये ऑर्बिटर पाठवले जात नाही. यावेळी स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल पाठवले जात आहे. ते लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल. यानंतर ते चंद्राभोवती १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत फिरत राहील. त्याचे वजन २१४५.०१ किलोग्रॅम असेल, त्यापैकी १६९६.३९ किलो इंधन असेल. म्हणजेच, मॉड्यूलचे वास्तविक वजन ४४८.६२ किलो आहे.

Web Title: 'Rocket Woman' responsible for Chandrayaan-3 mission; Who is Ritu Karidhal Shrivastava?, lets Know about him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.