रोहिंग्यांना भारतात आश्रय नाही, ते घुसखोर, निर्वासित नाहीत- राजनाथ सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:46 AM2017-09-22T04:46:48+5:302017-09-22T04:46:53+5:30
बांगलादेशमार्गे म्यानमारमधून आलेले रोहिंग्या मुस्लीम हे निर्वासित नसून, बेकायदा स्थलांतरित असल्याने त्यांना भारतात आश्रय दिला जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : बांगलादेशमार्गे म्यानमारमधून आलेले रोहिंग्या मुस्लीम हे निर्वासित नसून, बेकायदा स्थलांतरित असल्याने त्यांना भारतात आश्रय दिला जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या परिसंवादात राजनाथ सिंह म्हणाले की, निर्वासिताचा दर्जा मिळविण्याची एक निश्चित प्रक्रिया असते व यांच्यापैकी कोणीही ती पूर्ण केलेली नाही. त्यांनी भारताकडे राजाश्रयही मागितलेला नाही. त्यामुळे ते बेकायदा स्थलांतरित आहेत. मानवी हक्कांच्या नावाखाली बेकायदा स्थलांतरितांना निर्वासित ठरविण्याची चूक करता कामा नये.
म्यानमारच्या सीमेवरील रखाइन प्रांतात बंडखोरांनी सुरक्षा ठाण्यांवर हल्ले केल्यानंतर तेथील लष्कराने जोरदार कारवाई सुरू केली. तेव्हापासून त्या प्रांतातून सुमारे ४.२० लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात स्थलांतर केल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणणे आहे. त्यापैकी काही हजार रोहिंग्या भारतात आले आहेत.
>टीका अनाठायी
योग्य शहानिशा करून रोहिंग्यांना परत येऊ देण्यास म्यानमारची तयारी आहे, असे सांगून, राजनाथ सिंह म्हणाले की, रोहिंग्यांना परत पाठविण्याच्या भारताच्या भूमिकेवर होणारी टीका अनाठायी आहे. रोहिंग्यांना परत पाठविल्याने कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन होणार नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या १९५१च्या निर्वासितांसंबंधीच्या समझोत्यावर भारताने स्वाक्षरी केलेली नाही.