रोहित, कन्हैयाला न्याय द्या!
By admin | Published: February 24, 2016 02:53 AM2016-02-24T02:53:18+5:302016-02-24T02:53:18+5:30
संसदेच्या बजेट अधिवेशनाचा मुहूर्त साधून मंगळवारी ‘जस्टीस फॉर रोहित अँड कन्हय्या’ अशी हाक देत जेएनयू विद्यार्थी संघासह एनएसयूआय, डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना,
नवी दिल्ली : संसदेच्या बजेट अधिवेशनाचा मुहूर्त साधून मंगळवारी ‘जस्टीस फॉर रोहित अँड कन्हय्या’ अशी हाक देत जेएनयू विद्यार्थी संघासह एनएसयूआय, डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना, व ‘आप’च्या विद्यार्थी संघटनेने दिल्लीच्या प्रमुख रस्त्यांवरून जंतर मंतरपर्यंत एका संयुक्त मोर्चाचे आयोजन केले.
विद्यार्थ्यांना संबोधित करतांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या करणाऱ्या रोहित वेमुलाला मृत्यूनंतरही न्याय मिळालेला नाही. ज्या केंद्रीय मंत्र्यांवर याबाबत आरोप झाले, त्यांची साधी चौकशीही आजपर्यंत झाली नाही.
हैदराबाद आणि जेएनयू परिसरात जे घडले त्याला भाजपची अभाविप ही संघटनाच जबाबदार आहे, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.
रोहितच्या कुटुंबीयांची ओळख करून देत प्रकाश आंबेडकरांनीही मोर्चाला उद्देशून भाषण केले. रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यावेळी म्हणाले, ‘रोहितला न्याय मिळावा, यासाठी आम्ही इथे आलो आहोत. त्याच्या आत्महत्याप्रकरणात स्मृती इराणी, बंडारू दत्तात्रय व विद्यापीठाच्या कुलगुरूंची चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. (विशेष प्रतिनिधी)
जंतर-मंतर राहुल गांधी, केजरीवाल, प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती
आंबेडकर भवनापासून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो विद्यार्थ्यांबरोबर रोहितचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.
मोदी सरकार, भाजप व रा.स्व. संघाच्या विरोधात आक्रमक घोषणा देत हा मोर्चा जंतर मंतर वर पोहोचला, तेव्हा राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, प्रकाश आंबेडकरांसह काही डावे नेतेही तिथे झाले. या नेत्यांच्या उपस्थितीमुळे मोर्चाला खूपच महत्त्व मिळाले.
भाजपकडून सत्तेचा दुरूपयोग
भाजपने सत्तेचा उघड दुरूपयोग चालवला असल्याचा आरोप करून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, संघाची कालबाह्य विचारसरणी लादण्यासाठी अभाविपसारख्या संघटनांच्या चिथावणीवरून देशभर महाविद्यालये व विद्यापीठांच्या प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर सुरू आहे.
विविध पक्षाच्या खासदारांनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. त्यात महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, राजीव सातव, बिहारचे पप्पू यादव आदींचा समावेश होता.
विद्यार्थ्यांवर दहशत बसवण्यासाठी विद्यापीठ परिसरात पोलीस तैनात केले जात आहेत. अभ्यासाच्या वातावरणावर तणावाची छाया निर्माण केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज यापुढे दडपू शकणार नाही, असा कायदा करणे गरजेचे आहे.