रोहित खंडेलवाल ठरला यंदाचा ‘मिस्टर वर्ल्ड’!
By admin | Published: July 21, 2016 04:51 AM2016-07-21T04:51:05+5:302016-07-21T04:51:05+5:30
‘हैदराबाद शहर सोडल्यानंतर हातात केवळ दोन बॅग घेऊन मी स्वप्नांना पंखांचे बळ देण्यासाठी मुंबईत आलो.
नवी दिल्ली : ‘हैदराबाद शहर सोडल्यानंतर हातात केवळ दोन बॅग घेऊन मी स्वप्नांना पंखांचे बळ देण्यासाठी मुंबईत आलो. क्षमतेच्या बाहेर जाऊन परिश्रम करण्यावर माझा गाढ विश्वास आहे. लक्ष्य गाठण्यास मी कठोर परिश्रम घेतले,’ असे ‘मिस्टर वर्ल्ड २०१६’ चा किताब पटकावणारा रोहित खंडेलवाल याने म्हटले आहे.
रोहितने लंडनहून ‘लोकमत’शी फोनवर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. मॉडेल, अभिनेता, टीव्ही कलावंत आणि २०१५ चा मिस्टर इंडिया किताब पटकावणारा २७ वर्षीय रोहित आता ‘मिस्टर वर्ल्ड २०१६’ने सन्मानित करण्यात आलेला पहिला आशियन ठरला. आपल्या चाहत्यांना दिलेल्या संदेशात रोहित म्हणतो, ‘काहीतरी चांगले करा आणि आपले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक दिवस हा नवा दिवस समजून जगा.’ ‘मिस्टर वर्ल्ड २०१६’चा किताब जिंकणारा पहिला भारतीय ठरल्याबद्दल कसे वाटते, या प्रश्नाच्या उत्तरात रोहित म्हणाला, हे सारे काही मला स्वप्नवत वाटते आणि त्या भावनेतून मी अद्याप बाहेर आलेलो नाही. मी अगदी साधासुधा माणूस आहे आणि प्रदीर्घ काळापासून कठोर परिश्रम घेत आहे. हा किताब मिळविताना मला मोठा अभिमान वाटतो आणि माझे हे यश कुटुंबीय आणि मित्रांसोबत साजरे करण्याकरिता लवकरात लवकर मी भारतात परतण्यासाठी आतूर आहे.
रोहित सध्या लंडनमध्ये आहे. पुढच्या आठवड्यात तो मुंबईत परतेल. मुंबईत दोन दिवस घालविल्यानंतर तो हैदराबादला जाईल. तेथे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याचे जंगी स्वागत करण्याचे ठरविले आहे.
>आनंद गगनात मावेना!
‘मी त्याच्या भेटीसाठी आतूर आहे. आम्ही त्याच्या जय्यत स्वागताची तयारी करीत आहोत. माझ्या मुलाकडून ही आनंदाची वार्ता कळाल्यापासून मला झोपही लागलेली नाही.
- सुमनलता खंडेलवाल, रोहितची आई
आपण जगाच्या सर्वोच्च शिखरावर असल्याचे वाटत आहे. त्याने देशाचा मान वाढविला आहे. रोहितच्या भव्य स्वागताची तयारी केली असून मुंबई, हैदराबाद विमानतळावरच आनंद साजरा करणार आहोत.
-राहुल खंडेलवाल, रोहितचा भाऊ