रोहित शेखर यांची हत्याच झाली; कुटुंबियांची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 03:44 AM2019-04-21T03:44:21+5:302019-04-21T03:44:38+5:30

गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल

Rohit Shekhar was murdered; Inquiries of family started | रोहित शेखर यांची हत्याच झाली; कुटुंबियांची चौकशी सुरू

रोहित शेखर यांची हत्याच झाली; कुटुंबियांची चौकशी सुरू

Next

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर (३९) यांची हत्याच झाली असल्याचे मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीतून समोर आले आहे. रोहित यांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

मंगळवारी रोहित यांना दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांचा आधीच मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेकडे तपास सोपविला आहे. एम्स रुग्णालयाचे प्राध्यापक आणि न्यायवैद्यक विज्ञान शाखेचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, पाच डॉक्टरांच्या पथकाने रोहित यांचे शवविच्छेदन केले. रोहित यांच्या मानेवर काही खुणा आढळल्या आहेत. एक किंवा त्यापेक्षा अधिक उशांनी तोंड दाबून त्यांना मारण्यात आले असावे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रोहित यांच्या डिफेन्स कॉलनीतील घरात काही उशा सापडल्या असून, त्यातील एका उशीवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. पुढील आठवड्यात शवविच्छेदनाचा संपूर्ण अहवाल येईल, तेव्हाच चित्र अधिक स्पष्ट येईल. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रोहित यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केली आहे. न्यायवैद्यक डॉक्टरांचे पथक आणि पोलीस यांनी घराची पाहणी केली. त्यांच्या कुटुंबियांच्या जबाबात तफावत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉक्टरांच्या अंदाजानुसार दुपारी १ ते १.३0 च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला असावा. मृत्यूच्या वेळी त्यांचा भाऊ सिद्धार्थ, पत्नी अपूर्वा आणि काही नोकर घरी होते.

त्यादिवशी नेमके काय झाले?
रोहित हे मतदान करून सोमवारी सकाळी ११.३० वा. घरी परतले. मंगळवारी सायंकाळी ४.४१ वा. त्यांचा मृतदेह घरात सापडला. त्यांनी आत्महत्या केली असावी, असे सुरुवातीला वाटले होते. मॅक्स हॉस्पिटलला त्यांच्या घरून फोन आला तेव्हा त्यांच्या आई उज्ज्वला तिवारी स्वत:वर उपचार करून घेण्यासाठी रुग्णालयातच होत्या. उज्ज्वला यांना घरून फोन आला की, रोहित यांच्या नाकातून रक्त येत आहे. त्या अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन घरी गेल्या. रोहित यांना ५ वा. रुग्णालयात आणले तेव्हा ते मृतावस्थेतच होते.

Web Title: Rohit Shekhar was murdered; Inquiries of family started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून