रोहित वेमुला हा दलित नव्हताच : सुषमा स्वराज
By admin | Published: January 31, 2016 10:04 AM2016-01-31T10:04:25+5:302016-01-31T10:07:47+5:30
हैदराबाद विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी, रोहित वेमुला हा दलित नव्हताच असा दावा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केला .
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - हैदराबाद विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी, रोहित वेमुला हा दलित नव्हताच असा दावा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केला आहे. रोहितच्या आत्महत्येप्रकरणी दोषींना शिक्षा होण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत असतानाच भाजपा नेत्या स्वराज यांनी रोहितच्या जातीचा मुद्दा उपस्थित करत दलित मुद्यावरून होणा-या चर्चेला महत्व नसल्याचे नमूद केले.
' या प्रकरणात जे तथ्य समोर आले आहे आणि जी माहिती मला मिळाली आहे, त्यानुसार रोहित हा दलित नव्हताच. मात्र काही जणांनी त्याला दलित म्हणून या संपूर्ण प्रकरणाला सांप्रदायिक रंग दिला आहे. दलित प्रकरणावरून या विषयावर जी काही चर्चा सुरू आहे त्याला काही महत्वच नाही' असे स्वराज यांनी म्हटले आहे.
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाला आता आक्रमक पवित्रा आला असून शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला तसेच एकदिवसीय उपोषणही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ उच्च स्तरावरून एक विचार लादून विद्यार्थ्यांची भावना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर रोहित वेमुला याच्या आत्महत्येची घटना महात्मा गांधी यांच्या हत्येसारखीच असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान रोहितच्या आत्महत्येस दोषी असणा-यांना पदावरून हटवण्याची मागणी अधिक जोर धरू लागली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ठेवत रोहितसह पाच दलित विद्यार्थ्यांवर ऑगस्ट २०१५ मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्याच नैराश्यातून रोहितने १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. रोहितच्या आत्महत्येपासून दोषींवर कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरु आहे.
Meri puri jankaari ke anusaar wo baccha dalit tha hi nahi: Sushma Swaraj, EAM on #RohithVemulapic.twitter.com/smgP7uB9Mj
— ANI (@ANI_news) January 30, 2016