रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण : दलित विरुध्द दलितेतर संघर्ष नाही - स्मृती इराणी
By admin | Published: January 20, 2016 04:52 PM2016-01-20T16:52:00+5:302016-01-20T18:12:28+5:30
हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरु आहे पण हा दलित विरुध्द सवर्ण असा संघर्ष नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरु आहे पण हा दलित विरुध्द दलितेतर असा संघर्ष नाही असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी दुपारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले.
रोहित वेमुलाच्या मृत्यूसाठी विरोधक केंद्र सरकारला जबाबदार ठरवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणी यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन आपली बाजू मांडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यावर हल्ला केल्या प्रकरणी रोहित आणि अन्य चार विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते.
विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या उपसमितीच्या शिफारसीवरुन ही कारवाई करण्यात आली होती. या पाचविद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या वर्गाला उपस्थित रहाण्याव्यतिरिक्त वसतिगृहात येण्यावर बंदी घालण्यात आली होती असे इराणी यांनी सांगितले. काही जण या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा दलित विरुध्द दलितेतर असा संघर्ष नसल्याचे त्यांनी सांगितले.
रोहितने लिहीलेल्या आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये कुठल्याही संघटनेचे नाव घेतलेले नाही फक्त शेवटी आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे नाव घेतले आहे. राजकीय अपरिहार्यतेमुळे राजकीय पक्षांना विद्यापीठामध्ये जावे लागत आहे असे इराणी म्हणाल्या.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येसाठी केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला जबाबदार धरण्यात आले असून, स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. बंडारु दत्तात्रय यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
स्मृती इराणी यांच्या पत्रकारपरिषदेतील मुद्दे
काँग्रेस खासराद हनुमंत राव यांच्या चिठ्ठीनुसार हैदराबाद विद्यापीठात मागच्या चारवर्षांपासून समस्या होत्या, काँग्रेसने त्यावेळी लक्ष घालून समस्या सोडवल्या असत्या तर, रोहित वेमुला आज जिवंत असता.
काँग्रेस खासदार हनुमंत राव यांनी हैदराबाद विद्यापीठाचा मुद्दा उपस्थित केला होता, रोहितने लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये बंडारु दत्तात्रय यांचे नाव नाही.
हैदराबाद विद्यापीठाची कार्यकारी परिषद या सरकारने नेमलेली नाही, मागच्या सरकारने या परिषदेवरील प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये कुठल्याही खासदाराचे, विद्यापीठाच्या अधिका-याचे आणि संस्थेचे नाव नाही.
वसतिगृहातून विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते, या निलंबनाला विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, उच्च न्यायालयाने आदेशाला स्थगिती द्यायला नकार दिला होता.
रोहित वेमुला मृत्यू प्रकरणात तथ्य चुकीच्या पध्दतीने सादर केली.
रोहित वेमुलाचा मृत्यू हा दलित विरुध्द अन्य असा संघर्ष नाही, विद्यार्थ्यांच्या एका गटाने दुस-या विद्यार्थ्यावर हल्ला केला होता.
रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर मी माझ्या दु:खद भावना व्यक्त केल्या.