रोहितची आत्महत्या वेदनादायी
By admin | Published: January 23, 2016 04:14 AM2016-01-23T04:14:31+5:302016-01-23T04:14:31+5:30
हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत रोहितच्या
लखनौ/वाराणसी : हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत रोहितच्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला. मात्र त्यांनी त्या वादात पडणे टाळले. लखनौच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील दीक्षान्त समारंभात बोलत असतानाच पंतप्रधानांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
‘मोदी गो बॅक’ आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’ची घोषणाबाजी करीत काही विद्यार्थ्यांनी मोदींच्या व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात लगेचच पोलिसांनी या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. या गोंधळातही मोदी यांचे भाषण सुरू होते.
माझ्या देशातील एक युवा पुत्र रोहित यास आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले, हे वेदनादायी आहे. पुत्र गमावलेल्या एका माऊलीचे दु:ख मी जाणू शकतो. या घटनेमागचे कारण आणि त्यावरून सुरू असलेले राजकारण आपल्या जागी आहे, केवळ एका माऊलीने पोटचा गोळा गमावला, हेच वास्तव आहे. मी हे दु:ख समजू शकतो, असे मोदी म्हणाले. अर्थात या प्रकरणी दोन केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध होत असलेल्या आरोपांवर बोलणे त्यांनी टाळले. युवा वर्गाच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नरत आहे, हे सांगतानाच ‘जॉब सीकर’ नाही तर ‘जॉब क्रिएटर’ बना, असे आवाहन त्यांनी समस्त तरुणाईला केले.
तत्पूर्वी वाराणसी या आपल्या मतदारसंघात मोदींच्या हस्ते दिव्यांगांना मदत उपकरणांचे वितरण करण्यात आले. भाजपाप्रणित रालोआ सरकार गरीब, दलित व शोषितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. माझ्यावर सर्रास शाब्दिक हल्ले केले जातात. मला वादात गोवण्याचे प्रयत्न होतात. कधीकधी संपूर्ण जग माझ्या विरोधात गेले आहे, असे मला वाटते. पण गरीब आणि उपेक्षित व गरजूंसाठी झटणे, त्यांची मदत करणे हा माझा मूलमंत्र आहे. त्यामुळे माझ्यावर तुटून पडणाऱ्यांची मी जराही पर्वा करीत नाही. व्यवस्था बदलते आहेत, त्यामुळे हे होत आहे. मध्यस्थ, दलालांना बाजूला सारले जात आहे. दुकानदाऱ्या बंद केल्या जात आहे. त्याचमुळे काही लोक अस्वस्थ आहेत. पण मी मात्र जराही अस्वस्थ नाही. मी अस्वस्थ आहे तर ते केवळ गरिबांची दुर्दशा आणि त्यांच्या समस्यांमुळे, असे मोदी यावेळी म्हणाले.
‘सुगम्य भारत अभियान’
सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांग लोकांना सुविधा प्रदान करण्यासोबतच त्यांचे आयुष्य अधिक सुविधाजनक बनविण्यास मदत करण्यासाठी मोदींनी ‘सुगम्य भारत अभियान’ चालविण्याची घोषणा केली. गरज भासल्यास यासाठी काही नियम व कायदे बदलण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. सरकारी कार्यालयांत दिव्यांग लोकांसाठी विशेष मार्ग आणि शौचालयाच्या सीट असतील, असेही त्यांनी सांगितले.
‘दिव्यांग’ घेऊन जाणाऱ्या बसला अपघात
वाराणसी: पंतप्रधानांच्या मदत वितरण कार्यक्रमासाठी दिव्यांगांना घेऊन निघालेली एक बस शुक्रवारी सकाळी येथील एका खांबांवर आदळली. यामुळे या अपघातात २२ जण जखमी झाले. बसमध्ये सुमारे ४२ दिव्यांग व्यक्ती होत्या. मोदींनी आपल्या मतदारसंघात सुमारे ८ हजार दिव्यांगांना मदत साहित्याचे वाटप केले.