रोहितचे शतक पुन्हा वाया, दुस-या सामन्यातही ऑस्ट्रेलिया विजयी

By admin | Published: January 15, 2016 08:46 AM2016-01-15T08:46:48+5:302016-01-15T17:11:24+5:30

बेली, फिंच आणि मार्शच्या संयमी खेळीमुळे दुस-या एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियाने भारतावर ७ गडी राखून विजय मिळवला.

Rohit's win again, Australia win in second match | रोहितचे शतक पुन्हा वाया, दुस-या सामन्यातही ऑस्ट्रेलिया विजयी

रोहितचे शतक पुन्हा वाया, दुस-या सामन्यातही ऑस्ट्रेलिया विजयी

Next

ऑनलाइन लोकमत 

ब्रिस्बेन, दि. १५ -  बेली (नाबाद ७६), फिंच (७१) आणि मार्श (७१) यांच्या संयमी खेळीमुळे दुस-या एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियाने भारतावर ७ गडी राखून विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी आघाडी घेतली आहे. या पराभवामुळे सुलग दुस-यांदा रोहित शर्माची शतकी खेळी वाया गेली. 
ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांत ३ गडी गमावून भारताच्या ३०९ धावांचे आव्हान सहज पार केले. भारतातर्फे शर्मा, यादव आणि जडेजाने प्रत्येकी १ बळी टिपला. १२४ धावांची खेळी करत सलग दुस-यांदा शतक ठोकणा-या रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात 'मॅन ऑफ दि मॅच'चा खिताब देण्यात आला. सलामीवीर रोहित शर्माचे शतक(१२४) आणि अजिंक्य रहाणेची (८९) शानदार खेळी यामुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने ५० षटकांत ८ गडी गमावून ३०८ धावा केल्या. 
' सध्याच्या स्थितीत आमच्या गोलंदाजांची कामगिरी पाहता, फलंदाजांनी आणखी मेहनत घेऊन प्रतिस्पर्धी संघासमोर सुमारे ३३० धावांचे आव्हान ठेवले पाहिजे', असे मत कर्णधार महेंद्रसिग धोनीने या पराभवाचे विश्लेषण करताना मांडले. ' आम्ही आमच्या परीने सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण सर्वात शेवटी तुमचा परफॉर्मन्स महत्वाचा ठरतो. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी खरच उत्तम कामगिरी केली' असेही धोनी म्हणाला.
 
भारताने धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा मात्र शिखर धवन लवकर बाद झाल्याने ९ धावांवर असताना संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीच्या (५९) साथीने डाव सावरला, त्यांनी दुस-या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. मात्र संघाची धावसंख्या १३४ असताना विराट बाद झाल्याने त्यांची जोडी फुटली. त्यानंतर रोहित शतक ठोठावत भारताला २५० चा टप्पा गाठून दिला तर अजिंक्यनेही ८० चेंडूत ८९ धावा फटकावल्या. 
मात्र धोनी(११), मनिष पांडे (६), जडेजा (५) आणि अश्विन (१) हे खेळाडू अपयशी ठरले. उमेश यादव (०) नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियातर्फे फॉकनरने २, तर  हॅस्टिंग्ज,  पॅरिस व बोलँडने प्रत्येकी १ बळी टिपला. ३ खेळाडू धावबाद झाले.
भारताने आपल्या संघात एक बदल करत भुवनेश्वर कुमारच्या जागी इशांत शर्माला स्थान दिले. 
ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. जोश हेझलवूड, मिचेल मार्श आणि डेव्हीड वॉर्नरला विश्रांती देऊन त्यांच्या जागी शॉन मार्श, जॉन हॅजटींग आणि केन रिचर्डसनला संघात स्थान दिले आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३०९ धावांचा डोंगर रचूनही भारताला ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखता आले नव्हते. 
सलमीवीर रोहित शर्माची  (१७१) धावांची खेळी वाया गेली होती. 

Web Title: Rohit's win again, Australia win in second match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.