पतीने लाखो रुपयांची नोकरी सोडून घर सांभाळलं; पत्नीने न्यायाधीश होऊन स्वत:ला सिद्ध केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 05:23 PM2022-09-22T17:23:51+5:302022-09-22T17:35:57+5:30
प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो याचे हजारो किस्से ऐकायला मिळतात. मात्र, हरियाणातील एका दाम्पत्याची गोष्टच वेगळी आहे. या महिलेच्या यशामागे एका पुरुषाचे योगदान आहे.
पती घराबाहेर काम करेल आणि पत्नी घरातील चूल सांभाळेल, ही म्हण आता बदलत चालली आहे. पती-पत्नी आता खांद्याला खांदा लावून जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच ते एकमेकांना प्रोत्साहनही देत आहेत, हे बदलत्या समाजासाठी सुखद संकेत आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये असेच एक जोडपं आहे, ज्यांनी समाजाला नवी दिशा दिली आहे. दोघांनी एकत्र काम केले तर काहीही अशक्य नाही हे सिद्ध करून दाखवलं आहे.
प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो याचे हजारो किस्से ऐकायला मिळतात. मात्र, हरियाणातील एका दाम्पत्याची गोष्टच वेगळी आहे. या महिलेच्या यशामागे एका पुरुषाचे योगदान आहे आणि तो पुरुष दुसरा कोणी नसून तिचा पती आहे. नुकताच उत्तर प्रदेश उच्च न्यायिक सेवेचा निकाल लागला. या परिक्षेत रोहतकच्या मंजुळा भालोठिया हिने पहिला क्रमांक पटकावला आहे.
प्रत्येक परिक्षेत कुणी ना कुणी टॉप करतो, त्यामुळे ही बाब सामान्य वाटू शकते. मात्र, मंजुळाची कहाणी वेगळी आहे. मंजुळा आणि तिचे पती सुमित अहलावत रोहतक येथे राहतात. सुमित एका कंपनीत लाखो रुपये पॅकेज असलेली नोकरी करत होते. तर मंजुळा हिला न्यायाधीश बनायचे होते आणि हे तिचे स्वप्न होते. पण मुलांची जबाबदारीही असलेल्या तिच्यासमोर हे मोठे आव्हान होते. मुलांना सांभाळण्यासोबतच अभ्यास करणंही अवघड काम होतं. अशा परिस्थितीत मंजुळाच्या अभ्यासासाठी सुमितने नोकरी सोडली आणि स्वतः घर सांभाळायला सुरुवात केली.
घरखर्च चालवण्यासाठी मंजुळा अभ्यासासोबतच नोकरी करायची. मात्र, मंजुळाच्या अभ्यासात व्यत्यय यायला नको म्हणून सुमित हा पूर्णपणे घरी मुलांची काळजी घ्यायचा. त्यांच्या शाळेचा टिफीन आणि घरातील स्वयंपाकघराची जबाबदारी पार पाडू लागला. सुमितने नोकरी सोडली तेव्हा त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला खूप समजावून सांगितले की हे पाऊल योग्य नाही आणि तू बाईसारखा चूल पेटवायला लागलास, हे तुझ्या भविष्यासाठी चांगले होणार नाही, तू तुझ्या पायावर कुऱ्हाड मारत आहेस.
सुमितने कोणाचेच ऐकले नाही आणि आनंदाने घरातील सर्व जबाबदारी पार पाडायला सुरुवात केली. तर दुसरीकडे मंजुळाने तीन वेळा न्यायाधीशाची परिक्षा दिली होती. मात्र, ती पास झाली नाही. मंजुळा निराश होत होती, तेव्हा सुमित तिला आत्मविश्वास वाढवत होता आणि पुढच्या वेळी छान होईल, असे सांगायचा. 12 सप्टेंबरला जेव्हा उत्तरप्रदेश न्यायिक सेवा परिक्षेचा निकाल लागला तेव्हा सुमितनेच तिचा निकाल पाहिला आणि जेव्हा तो मंजुळाच्या समोर गेला तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले. मंजुळाला वाटले की यावेळीही तिची निवड झाली नाही. मात्र, थोडा वेळ गप्प राहिल्यावर दोघेही आनंदाने ओरडले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.