रोहतकमध्ये बलात्कारानंतर तरुणीची निर्घृण हत्या
By admin | Published: February 8, 2015 02:58 PM2015-02-08T14:58:57+5:302015-02-08T18:52:13+5:30
अज्ञात नराधमांनी २८ वर्षाच्या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीची बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना रोहतकमध्ये घडली असून बलात्कारानंतर नराधमांनी पिडीत तरुणीच्या गुप्तांगामध्ये छोटी खडी टाकली होती.
Next
>ऑनलाइन लोकमत
रोहतक (हरियाणा), दि. ८ - दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणासारखीच अंगावर शहारे आणणारी घटना रोहतकमध्ये घडली आहे. अज्ञात नराधमांनी २८ वर्षाच्या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीची बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना रोहतकमध्ये घडली असून बलात्कारानंतर नराधमांनी पिडीत तरुणीच्या गुप्तांगामध्ये छोटी खडी टाकून ठेवल्याचे समोर आले आहे. या संतापजनक घटनेची दखल महिला आयोगाने घेतली असून महिला आयोगाने रोहतक पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.
नेपाळमध्ये राहणारी २८ वर्षीय तरुणी हरियाणातील रोहतकमध्ये राहणा-या तिच्या बहिणीकडे आली होती. तिला मानसिक आजार असून यासाठी तिच्यावर उपचारही सुरु होते.संबंधीत तरुणी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तीन दिवसांपूर्वी तिचा मृतदेह रोहतकमधील ग्रामीण भागातील निर्जन ठिकाणी आढळला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पंडित भगवत दयाल शर्मा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे पाठवला. या शवविच्छेदनातून अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नराधमांनी पिडीत तरुणीवर बलात्कार केला व यानंतर तिची हत्या केली. हत्येपूर्वी नराधमांनी तिच्या गुप्तांगात काठी, छोटी खडी टाकण्याचे अत्यंत निर्घृण कृत्यही केले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे शवविच्छेदन करणे कठीण होते, माझ्या आजवरच्या कारकिर्दीत ऐवढे अघोरी कृत्य मी कधीच बघितले नव्हते असे डॉ. एस.के. धत्तेरवाल यांनी सांगितले. धत्तेरवाल यांनी आत्तापर्यंत सुमारे ३० हजार ऑटोप्सी केल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यावर पोलिसांनी अज्ञात नराधमांविरोधात बलात्कार, हत्या, अनैसर्गिक संभोग अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. नराधमांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकं तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणातही नराधमांनी असे क्रूरकृत्य केले होते. रोहतकमधील घटनेने निर्भया प्रकरणाची जखम ताजी केली आहे.