२०२३ ची धडाक्यात सुरुवात; ७१,००० जणांना मिळाली सरकारी नोकरी, मोदी म्हणाले...आणखी लाखो नोकऱ्या मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 12:41 PM2023-01-20T12:41:15+5:302023-01-20T12:42:41+5:30
PM Rojgar Mela 2023: आजचा २० जानेवारीचा दिवस देशातील ७१ हजार तरुणांसाठी खूप आनंद घेऊन आला आहे.
PM Rojgar Mela 2023: आजचा २० जानेवारीचा दिवस देशातील ७१ हजार तरुणांसाठी खूप आनंद घेऊन आला आहे. त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळालं आहे. आज २०२३ सालचा पहिला रोजगार मेळावा घेण्यात आला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील एकूण ७१,००० तरुणांना सरकारी नोकरीची भेट दिली आहे. त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे. पीएम मोदींनी हजारो तरुणांना ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोकरीची नियुक्तीपत्रं दिली आहेत.
सरकारी नोकऱ्या मिळवून आता सरकारी कर्मचारी झालेल्या या तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "२०२३ चा हा पहिला रोजगार मेळा आहे. यासह नवीन वर्षाची सुरुवात उज्ज्वल भविष्याच्या नव्या आशेने झाली आहे. नोकरी मिळालेल्या सर्व तरुणांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन. येत्या काही दिवसांत आणखी लाखो कुटुंबांना सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत"
एनडीए, भाजपशासित राज्यांमध्येही रोजगार मेळावा
७१,००० तरुणांना नियुक्तीपत्रे सुपूर्द करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत सरकार एनडीए आणि भाजप शासित राज्यांमध्येही सातत्याने रोजगार मेळावे आयोजित करत आहे. हे तरुणांना सक्षम बनवत आहे आणि देशाच्या विकासात त्यांचा सहभाग सुनिश्चित करत आहे. रोजगार मेळाव्याचे हे सततचे आयोजन ही आपल्या सरकारची ओळख बनली आहे. यावरून सरकारने घेतलेल्या ठरावाची पूर्तता कशी होते हे दिसून येते.
Addressing the Rozgar Mela. Best wishes to the newly inducted appointees. https://t.co/1jA5ocfXdH
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2023
यादरम्यान काश्मीरच्या फैजल शौकत शाह, बंगालच्या सुप्रभा, बिहारच्या दिव्यांग राजू कुमार आणि पश्चिम सरकारी नोकऱ्या मिळालेल्या तेलंगणाच्या वायसी कृष्णा यांच्यासह काही तरुणांनी आपला संघर्ष आणि अनुभव पंतप्रधानांसोबत शेअर केले.
कोणत्या नोकऱ्या मिळाल्या?
सध्या आयोजित केले जाणारे रोजगार मेळावे केंद्र सरकारच्या १० लाख भरती मोहिमेचा एक भाग आहेत. २०२२ मध्ये पहिल्या रोजगार मेळाव्यात ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या असून त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये ७१ हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. या मालिकेतील हा तिसरा जॉब फेअर आहे. यामाध्यमातून कनिष्ठ अभियंता, लोको पायलट, तंत्रज्ञ, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, लघुलेखक, कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, आयकर निरीक्षक, शिक्षक, परिचारिका, डॉक्टर, सामाजिक सुरक्षा अधिकारी, पीए अशा पदांवर सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.