विकासामध्ये बॅँकांची भूमिका प्रभावी : अर्थमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 12:01 AM2020-09-10T00:01:36+5:302020-09-10T00:01:41+5:30
देशातील शेड्युल्ड कमर्शिअल बॅँकांच्या तसेच प्रमुख बिगर बॅँकिंग वित्तसंस्थांच्या प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संवाद साधला.
नवी दिल्ली : सध्याच्या कोरोना विषाणूच्या स्थितीमुळे खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल घडविण्यामध्ये बॅँकांची भूमिका प्रभावी राहणार आहे. बॅँकांनी आपल्या प्रमुख उद्योगाकडे लक्ष्य केंद्रित करणे जरूरीचे असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.
देशातील शेड्युल्ड कमर्शिअल बॅँकांच्या तसेच प्रमुख बिगर बॅँकिंग वित्तसंस्थांच्या प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. मोरॅटोरियमचा कालावधी संपल्यानंतर कर्जदारांना बॅँकांच्या मदतीची अधिक गरज लागेल, असे सांगून सीतारामन यांनी या कर्जदारांना हप्ते न भरल्याबाबत कोणताही त्रास देऊ नये. तसेच त्यांची पत कमी झाली असे मानू नये. याकडे पूर्णपणे लक्ष पुरविण्याच्या सूचना केल्या.
बँकांनी आपल्या सर्व पात्र कर्जदारांपर्यंत पोहोचून त्यांना या अवघड परिस्थितीमध्ये शक्य ती सर्व मदत देणे गरजेचे असल्याचे सीतारामन यांनी या प्रमुखांना सांगितले. त्यासाठी एक कृती आराखडा तयार करून त्यानुसार काम करण्याची गरज असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले. आपल्या मदतीमुळेच उद्योग-धंदे पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करावयास प्रारंभ करणार असल्याचे सीतारामन यांनी यावेळी सांगितले.