दलाई लामांबाबतची भूमिका बदलली नाही, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:44 AM2018-03-03T00:44:13+5:302018-03-03T00:44:13+5:30
तिबेटीयन बौद्ध धर्मगुरू दलाई लामांबाबतची भूमिका केंद्र सरकारने बदललेली नाही़ त्यांना भारतात धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : तिबेटीयन बौद्ध धर्मगुरू दलाई लामांबाबतची भूमिका केंद्र सरकारने बदललेली नाही. त्यांना भारतात धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. दलाई लामा यांच्या कार्यक्रमांपासून दूर राहा, असे फर्मान परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंत्री व सनदी अधिका-यांना गेल्या महिन्यात बजावले होते. चीनचे परराष्ट्र मंत्री व सचिव यांची भेट घेण्यासाठी गोखले चीनला गेले होते. त्याआधी त्यांनी हे फर्मान जारी केले. या फर्मानाचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले होते.
त्यावर खुलासा करताना परराष्ट्र मंत्रालयाने वरील स्पष्टीकरण दिले़ दलाई लामांबाबत कोणतेही फर्मान जारी केलेले नाही. लामांविषयी भारताने भूमिका बदललेली नाही. त्यांना भारतात धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
>लामा यांना आश्रय देऊ नका- चीन
भारत व चीनमध्ये युद्ध सुरू होईल, असे चित्र गेले काही महिने सीमारेषेवर होते़ युद्धजन्य परिस्थिती निवळण्यासाठी उभय देशांमध्ये चर्चा सुरू आहे़ दलाई लामांविषयी चीन सुरुवातीपासूनच द्वेषी आहे़ लामा यांना आश्रय देऊ नका, असे जाहीरपणे चीन सर्व देशांना सांगतो़ भारत सरकार मात्र दलाई लामांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे़
अचानकपणे मोदी सरकारने लामांविषयी भूमिका बदलल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही लामा समर्थक देशांच्या भुवया उंचावल्या होत्या़ लामा यांनी याविषयी कोणतेही भाष्य केलेले नाही़
इंग्रजी दैनिकाचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर केंद्र सरकारवर चांगलीच टीका झाली़ चीनला खूश करण्यासाठी हे फर्मान जारी केले होते, असा आरोपही झाला होता़ केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केल्याने हा वाद निवळण्याची चिन्हे आहेत़