...म्हणून तरुण फिरवतात शेतीकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 02:37 PM2019-07-29T14:37:04+5:302019-07-29T14:47:42+5:30
शेतीशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या आणि घेत असलेल्या तरुण विद्यार्थ्यांनीही शेतीकडे पाठच फिरवली आहे
‘आपला देश शेतीप्रधान आहे. देशातील ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत’, हे वर्षानुवर्षे आपण ऐकत आलोत, पण खरंच शेती किती जण करतात, शेती करणाऱ्यांची संख्या किती आहे, हे आपल्याला माहीत आहे का?
यासंदर्भातली वस्तुस्थिती समजून घेतली तर आपल्याला धक्का बसेल. बेभरोशी शेती आणि जगण्याची ऐशीतैशी, हे वास्तव कायमच डोळ्यांसमोर असल्यानं ग्रामीण भागातही शेती करण्यास आता कोणी तयार नाही. शेतीतील तरुण मुलांची संख्या तर झपाट्यानं कमी होत आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वयही वाढत चाललंय.
‘डाऊन टू अर्थ’ या संस्थेचे अभ्यासक रिचर्ड महापात्रा यांच्या अभ्यासानुसार काळ्या मातीत धान्य पिकवणाऱ्या आणि देशाला ‘जगवणाऱ्या’ शेतकऱ्यांचं भारतातलं सरासरी वय पन्नाशीच्या पार गेलं आहे. २०१६ मध्ये केलेल्या एका पाहणीत भारतीय शेतकऱ्यांचं सरासरी वय होतं ५० वर्षे. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार भारतात दररोज सरासरी दोन हजार शेतकरी शेतीला रामराम ठोकताहेत.
यासंदर्भातलं वास्तव इतकं धक्कादायक आहे, की शेतकी विद्यापीठातून शेतीशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या आणि घेत असलेल्या तरुण विद्यार्थ्यांनीही शेतीकडे पाठच फिरवली आहे आणि शेती सोडून दुसऱ्या क्षेत्राकडे त्यांनी आपले लक्ष वळवले आहे. अर्थातच याचं कारणही स्पष्ट आहे. लहरी हवामान आणि बेभरोशी शेती. इतर क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा किमान पाच पटीनं अधिक आहे.
यासंदर्भात ‘प्रथम’ या संस्थेनं २०१७ साली तीस हजार तरुणांचा एक अभ्यास केला. या अभ्यासानुसार यातील केवळ १.२ टक्के तरुणांना शेती हा व्यवसाय म्हणून स्वीकारायचा होता, १८ टक्के तरुणांनी आर्मीला तर १२ टक्के तरुणांनी इंजिनिअरिंगला पसंती दिली होती. शेतीत महिलांचा वाटाही प्रचंड मोठा आहे, पण २५ टक्के महिलांनी शिक्षकी पेशाला पसंती दिली होती.
‘प्रथम’ या संस्थेचे संस्थापक माधव चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार शेतीतील तरुणांची संख्या कमी होते आहे, हे तर खरेच, पण शेतीच शेतकऱ्यांना बाहेर काढतेय, हेही यासंदर्भातलं एक मोठं वास्तव आहे. भारताची लोकसंख्या जशी वाढतेय, तशीच घरकुलांची संख्याही. गेल्या दहा वर्षांत घरकुलांची संख्या तब्बल ३३ टक्क्यांनी वाढलीय. त्यामुळेही शेती परवडेनाशी झालीय.
अर्थातच ही स्थिती फक्त भारतातच आहे असं नाही, अख्ख्या जगभरातल्या तरुणांना शेती नकोशी आहे. अमेरिकेत आज शेतकऱ्यांचं सरासरी वय आहे ५८ वर्षे, तर जपानमध्ये ६७ वर्षे. युरोपमधला प्रत्येक तिघांतला एक शेतकरी पासष्टीच्या पुढचा आहे. पुढच्या सहा वर्षांत जपानमधल्या ४० टक्के शेतकऱ्यांनी शेती सोडलेली असेल, अशी स्थिती आहे.
२०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १९० कोटीच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. अशावेळी अन्नधान्याचं उत्पादन हे भारतापुढचं सर्वोच्च असणार आहे. मात्र याच विपरित स्थितीत आशेचा एक किरणही डोकावतो आहे. जगभरात शेतकऱ्यांची ‘डिमांड’ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाल्यानं खोऱ्यानं पैसे मिळवण्याची अनोखी संधीही त्यांच्यापुढे चालून येणार आहे.