रूपानी हे भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा
By admin | Published: August 6, 2016 03:58 AM2016-08-06T03:58:09+5:302016-08-06T03:58:09+5:30
विजय रूपानी हे भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा असून, येत्या पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व आता त्यांच्याकडे येणार
अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेले विजय रूपानी हे भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा असून, येत्या पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व आता त्यांच्याकडे येणार आहे.
रुपानी आनंदीबेन पटेल मंत्रिमंडळात वाहतूक, पाणीपुरवठा, कामगार तसेच रोजगार खात्यांचे मंत्री होते. ब्रह्मदेशात जन्म झालेले रूपानी हे गुजरातमध्ये अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते. त्यांनी १९७१ साली भारतीय जनसंघाच्या कामाला सुरुवात केली. रूपानी हे ६0 वर्र्षाचे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील नेते म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यातील दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. विशेषत: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाला ते गरजेचे वाटू लागले आहे. ते १९९६ साली राजकोटचे महापौर होते. पुढे २00६ ते २0१२ या काळात ते राज्यसभेवर निवडून गेले होते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना रूपानी हे राज्य वित्त मंडळाचे अध्यक्ष होते. ते जैन समाजाचे असून, सध्या गुजरातमध्ये पाटीदार आणि दलित समाज भाजपावर नाराज असताना, भाजपाने मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करून, तटस्थ नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. याचे नेतृत्व आता रूपानी यांच्याकडे येईल. राज्यातील अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे. आनंदीबेन यांनी गत आठवड्यात फेसबुकवर एक पोस्ट टाकून राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. (वृृत्तसंस्था)
>...हे तर बुडते जहाज : बुडते जहाज चालविण्याची जबाबदारी घेतल्याबद्दल विजय रूपानी यांच्या साहसाचे कौतुक करायला हवे, असे टिष्ट्वट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केले आहे. गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून रूपानी यांच्या नावाची घोषणा भाजपने केल्यानंतर काँग्रेसने ही प्रतिक्रिया दिली.