जगाला हादरवणारा 'तो' हल्ला अन् विवेकानंदांचं भाषण; मोदींनी सांगितला योगायोग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 01:55 PM2019-09-11T13:55:04+5:302019-09-11T13:57:21+5:30
दहशतवादावर भाष्य करताना मोदींनी सांगितला योगायोग
मथुरा: दहशतवादाची समस्या आता काही देशांपुरती मर्यादीत राहिलेली नाही. देशांच्या सीमा ओलांडून ती जागतिक झाली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. शेजारच्या देशात दहशतवादाची पाळंमुळं रुजली आहेत. या दहशतवादानं जगासमोर अनेक समस्या निर्माण केल्या आहेत, असं म्हणत मोदींनी पाकिस्तानला लक्ष्य केलं. विविध कार्यक्रमांसाठी मोदी आज मथुरेच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला.
आज जगात दहशतवादाची विचारधारा निर्माण झाली आहे. त्यामुळे तिला आता देशाच्या सीमा उरलेल्या नाहीत. दहशतवाद जागतिक समस्या असल्यानं सर्वच देशांनी एकत्र येऊन तिचा सामना करायला हवा, असं आवाहन मोदींनी केलं. दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्ही ते अनेकदा दाखवून दिलं आहे. दहशतवादाविरोधातील लढाई यापुढेही सुरुच राहील. आमच्या सरकारनं दहशतवाद्यांविरोधात कठोर कायदे केले आहेत, असं म्हणत मोदींनी यूएपीएचा संदर्भ दिला.
दहशतवादावर बोलताना पंतप्रधान मोदींनी स्वामी विवेकानंद यांचं अमेरिकेतलं गाजलेलं भाषण आणि 9/11 हल्ला या दोन घटनांमधील योगायोग सांगितला. 'शतकभरापूर्वी स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये शांततेवर ऐतिहासिक भाषण दिलं. काही वर्षांनंतर नेमका त्याच दिवशी अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. त्या हल्ल्यानं संपूर्ण जग हादरलं. विवेकानंदांनी ज्या दिवशी शांततेच्या मुद्द्यावर भाषण करुन लोकांची मनं जिंकली, त्याच दिवशी काही वर्षांनी दहशतवादी हल्ला होणं हा अतिशय दुर्दैवी योगायोग आहे,' असं मोदी पुढे म्हणाले.