उत्तरेत नद्यांचे रौद्र रूप
By admin | Published: August 2, 2015 03:54 AM2015-08-02T03:54:54+5:302015-08-02T03:54:54+5:30
देशातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही राज्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत शंभरावर बळी गेले आहेत.
नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही राज्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत शंभरावर बळी गेले आहेत. गुजराततेत ठिकठिकाणी आलेल्या पुरात ६० जण तर पश्चिम बंगालमध्ये ४० लोक वाहून गेल्याचे वृत्त आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या गंगा, यमुना, राप्ती, घागरा आणि शारदा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांनी रौद्ररूप धारण केले असल्याने काठावरील भागात दहशत पसरली आहे. बलिया, वाराणसी आणि अलाहाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये लोकवस्तीत पाणी शिरले असून, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
याशिवाय जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात ढगफुटीमुळे अनेक गावांत पुराचा धोका निर्माण झाला आहे. तर आधीच ४ लाख लोक प्रभावित झालेल्या ओडिशात पुराचा व वादळाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशात ‘कोमेन’ चक्रीवादळ धडकल्यानंतर प्रचंड पाऊस कोसळत आहे. याशिवाय गुजरात व राजस्थानात मागील दोन दिवसांपासून संततधार आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने मोठे क्षेत्र पाण्याखाली बुडाले. कोमेन वादळामुळे ओडिशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे स्पेशल रिलिफ कमिशनर जी.व्ही.व्ही. शर्मा यांनी दिली. मिझोरम, त्रिपुरा आणि आसाममध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
जनजीवन विस्कळीत; रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प
पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली असून, कोलकाता शहरातील बहुतांश भागात पाणी शिरले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १३३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, उद्यापर्यंत गंगेलगतच्या पश्चिम बंगालच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोमेन चक्रीवादळ गुरुवारी बांगलादेशात पोहोचले होते.
राजस्थानात अनेक गावे पाण्यात
राजस्थानच्या जालौर, सिरोही आणि बिकानेर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली आली आहेत. जालौर जिल्ह्यातील सांचौर, भीनमाल, सरवाडा आणि चितळवाडासह नर्मदा धरणाच्या आजूबाजूच्या गावांत पाणी शिरल्याने मार्ग बंद पडले आहेत.